इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीच्या कराराला तीन आठवडे उलटले असून आता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जात आहे. आतापर्यंत, कराराच्या सध्याच्या टप्प्यात सुटका करण्यासाठी नियोजित ३३ बंधकांपैकी १६ जणांना हमासने मुक्त केले आहे. तर, जवळजवळ २००० कैद्यांच्या यादीतील ६५६ पॅलेस्टिनी कैद्यांना इस्रायलने मुक्त केले आहे. परंतु, हमासने इस्रायलवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केल्यानंतर या करारावरून वाद झाला आहे. अशातच आता इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला कठोर इशारा दिला आहे.
शनिवार दुपारपर्यंत ओलिसांची सुटका झाली नाही तर गाझामधील युद्धबंदी करार संपुष्टात येईल, असे स्पष्ट मत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी मांडले आहे. तसेच हमासचा पराभव होईपर्यंत सैन्य पुन्हा तीव्र लढाईत उतरेल, असा कठोर इशाराही त्यांनी एका व्हिडिओ निवेदनात दिला आहे. युद्धबंदी कराराचे इस्रायलने उल्लंघन केल्याबद्दल हमासने पुढील सूचना मिळेपर्यंत इस्रायली बंधकांना सोडण्याचे स्थगित केल्याची घोषणा केल्यानंतर नेतान्याहू यांनी हा इशारा दिला आहे.
इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याच्या युद्धबंदी करारानुसार गेल्या महिन्यात हमासने ओलिसांना सोडण्यास सुरुवात केली. इस्रायली कैदी आणि इतर पॅलेस्टिनींच्या बदल्यात हमास शनिवारी आणखी काही इस्रायली ओलिसांना सोडणार होता. मात्र, त्यानंतर हमासने आरोप केला की, इस्रायलने पॅलेस्टिनींना उत्तर गाझामध्ये परतवण्यास विलंब केला आणि मानवतावादी मदत देखील रोखली. इस्रायलने या आरोपांना फेटाळले असून दावा केला की त्यांनी इस्रायली सैन्याच्या ठिकाणांपासून दूर राहण्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तींवर गोळीबार केला आहे.
हे ही वाचा :
राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन
भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींना समन्स
हिंदू असल्यामुळे शिवकुमार शर्मांची हत्या?, आरोपींचा तबलिगी जमातशी संबंध?!
अंबानी कुटुंब पोहोचले महाकुंभात, संगमात केले स्नान!
आता हमासच्या आरोपांवर नेतन्याहू यांनी गाझा युद्धविराम करार संपुष्टात आणण्याची धमकी दिली आहे. हमासने कराराचे उल्लंघन करण्याचा आणि आमच्या ओलिसांना सोडण्याचा निर्णय न घेण्याच्या घोषणेनंतर, आयडीएफला गाझा पट्टीच्या आत आणि आजूबाजूला सैन्य जमवण्याचे आदेश दिल्याचे नेतन्याहू यांनी त्यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हमासला कठोर इशारा दिला होता. हमासने शनिवारी दुपारपर्यंत ओलिसांची सुटका केली नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील आणि नरकाची दारे उघडली जातील. तसेच त्यांनी करार रद्द करण्यावरही भाष्य केले होते.