राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत मराठा पातशाहीचे धुरंधर नेतृत्व महादजी शिंदे यांच्या नावाने ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यानंतर महाविकास आघाडीमध्ये यावरून नाराजी नाट्य रंगल्याचे चित्र आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाणे टाळायला हवे होते, असे म्हणत संजय राऊत यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते. ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्यासोबत खुलेआम बसणाऱ्यांना आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारी गोष्ट आहे,” असं संजय राऊत यांनी म्हणत शरद पवारांवर नाराजी व्यक्त केली.
“शरद पवारांची भावना वेगळी असेल पण, जनतेला हे काही पटलेलं नाही. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाह यांच्या सहकार्याने फोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना सन्मानित करता यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण काय आहे हे माहिती नाही. पण, आम्हालाही दिल्लीतील राजकारण कळतं पवार साहेब,” अशी टीका संजय राऊत यांनी शरद पवारांवर केली.
संजय राऊत पुढे म्हणाले की, राजकारणात काही गोष्टी टाळायला पाहिजेत. तुमचं आणि अजित पवार यांचं गुफ्तगू होत असेल, तो तुमचा कौटुंबिक प्रश्न आहे. अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं, याचं भान राखून आम्ही पावलं टाकतो, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
हे ही वाचा :
शनिवारपर्यंत ओलीसांना सोडा नाहीतर गाझाला बेचिराख करू!
राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन
भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींना समन्स
हिंदू असल्यामुळे शिवकुमार शर्मांची हत्या?, आरोपींचा तबलिगी जमातशी संबंध?!
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला केवळ प्रगतीच्या पथावर नेण्याचे काम केले नाही, तर राज्याच्या राजकारणाला योग्य दिशा देण्याचे काम केले, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावरही संजय राऊत यांनी टीका केली. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार बोलत असलेले खोटे आहे. ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला. ठाण्यातील गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव स्टेडिअम ही बाळासाहेब ठाकरेंची संकल्पना होती. सतीश प्रधान यांनी ती प्रत्यक्षात उतरवली. सतीश प्रधान यांच्याकडे विकासाची दृष्टी होती, त्यांनी टेंडरबाजी केली नाही. एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात खूप उशीरा आले. शरद पवारांना याबाबत माहिती नसेल, तर आम्ही ती पाठवून देऊ, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.