भारत क्रिकेट क्लब येथे सहावी स्व. अर्जुन मढवी महिला टी- २० स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील आठव्या सामन्यात व्हिक्टरी क्रिकेट क्लबने विजय मिळवला. प्रतिस्पर्धी संघ असलेल्या दहिसर स्पोर्ट्स क्लबचा ८० धावांनी पराभव करून दणदणीत विजय नोंदवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या व्हिक्टरी क्रिकेट क्लबने २० षटकांत ५ गडी बाद १५८ धावा उभ्या केल्या. संघाच्या डावाला अलीना मुल्ला हिने ३६ चेंडूत ५४ धावांची दर्जेदार खेळी करत भक्कम पायाभरणी करून दिली. शांत, संयमी आणि सातत्यपूर्ण फलंदाजी हीच अलीना हिची ओळख असून, व्हिक्टरी क्रिकेट क्लबच्या वरच्या फळीतील ती सर्वात विश्वासार्ह फलंदाज असल्याचे तिने पुन्हा सिद्ध केले.
स्व. प्रकाश पुराणिक टी-२० स्पर्धेदरम्यान, ‘बीसीसीआय अंडर- १९ एकदिवसीय स्पर्धे’त मुंबई अंडर- १९ मुलींच्या संघात सहभागी असल्यामुळे अलीना या काळात व्हिक्टरी संघासाठी उपलब्ध नव्हती. मात्र, तिच्या पुनरागमनामुळे संघाची फलंदाजी अधिक मजबूत झाली. संघाला महेक मिस्त्री (२८ धावा) आणि मानसी तिवारी (२१ धावा) यांनी मोलाची साथ दिली, तर माही ठक्कर हिने नाबाद ३७ धावा करत डावाच्या अखेरीस धावा जोडल्या. दहिसरकडून सोनाक्षी सोलंकी हिने तीन बळी घेत प्रभावी गोलंदाजी केली.
व्हिक्टरी क्लबने उभा केलेला धावांचा डोंगर गाठताना दहिसर स्पोर्ट्स क्लबचा डाव लवकर संपला. व्हिक्टरी क्लबच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या संघाला फार काळ मैदानात टिकता आले नाही. दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या संघाला २० षटकांत ७ गडी बाद ७८ धावांपर्यंतच मजल मारता आली. सौम्या सिंग हिने सर्वाधिक २१ धावा केल्या, तर स्नेहा रावराणे हिने १२ धावा जोडल्या.
हेही वाचा..
‘ऑपरेशन डेव्हिल हंट फेज-२’ पुन्हा सुरू
टोरोंटोमध्ये भारतीय वंशाच्या महिलेची हत्या
उत्तर प्रदेशात महिला उद्योजकतेला मजबूत आधार
मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र लढणार
व्हिक्टरीकडून नियती जगताप हिने ४ षटकांत १३ धावा देत २ बळी घेत उत्कृष्ट लेगस्पिन फिरकी गोलंदाजी केली. तिला मध्यमगती गोलंदाज ज्ञानी शेलटकर हिने २ बळी घेत मोलाची साथ दिली. माही ठक्कर आणि विधी मथुरिया यांनी प्रत्येकी एक बळी घेत दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या संघावर दबाव कायम ठेवला. सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीसाठी अलीना मुल्ला हिला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावसंख्या-
- व्हिक्टरी क्रिकेट क्लब: २० षटकांत १५८/५
अलीना मुल्ला ५४ (३६), माही ठक्कर ३७* (२२), महेक मिस्त्री २८
- दहिसर स्पोर्ट्स क्लब: २० षटकांत ७८/७
सौम्या सिंग २१, स्नेहा रावराणे १२
निकाल: व्हिक्टरी क्रिकेट क्लबचा ८० धावांनी विजय
सामनावीर: अलीना मुल्ला







