टी२० वर्ल्ड कप २०२६ मधील २७व्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६१ धावांनी मात करत स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला. या विजयासह भारताने ‘सुपर-८’ फेरीतील स्थान निश्चित केले. सामना आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात आला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ बाद १७५ धावा केल्या. डावाच्या सुरुवातीलाच अभिषेक शर्मा (०) बाद झाला. त्यानंतर ईशान किशनने आक्रमक फलंदाजी करत ४० चेंडूत ७७ धावा (१० चौकार, ३ षटकार) केल्या. त्याने तिलक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी ४६ चेंडूत ८७ धावांची भागीदारी केली. तिलक वर्माने २५ धावा केल्या.
मधल्या फळीत कर्णधार सूर्यकुमार यादवने २९ चेंडूत ३२ धावांचे योगदान दिले, तर शिवम दुबेने २७ धावा जोडल्या. शेवटी रिंकू सिंगने ४ चेंडूत नाबाद ११ धावा करत संघाची धावसंख्या १७५ पर्यंत पोहोचवली. पाकिस्तानकडून सईम अयूबने ३ बळी घेतले.
१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. साहिबजादा फरहान (०) लवकर बाद झाला. १३ धावांवर ३ गडी गमावल्यानंतर पाकिस्तान दबावात आला. उस्मान खानने ३४ चेंडूत ४४ धावा करत लढण्याचा प्रयत्न केला. शाहीन आफ्रिदीने २३ धावा केल्या, मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानचा डाव १८ षटकांत ११४ धावांवर संपला.
भारताकडून हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर कुलदीप यादव आणि तिलक वर्माने प्रत्येकी १ गडी बाद केला.
भारताने यापूर्वी यूएसए आणि नामिबियावर विजय मिळवला होता. १८ फेब्रुवारीला भारताचा पुढील साखळी सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे.







