: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याला ‘पर्सनॅलिटी राइट्स’ प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अभिषेक यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गैरवापर करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट आणि इंटरनेट लिंक हटविण्यासंदर्भात न्यायालयाने अंतरिम आदेश पारित करण्याचे संकेत दिले आहेत.
या प्रकरणी न्यायालयाने संबंधित पक्षांना समन्स बजावले असून, अभिषेक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच अंतरिम आदेश दिला जाणार आहे. अभिषेक यांच्या वकिलांनी आक्षेपार्ह यूआरएलची माहिती देणारे अतिरिक्त प्रतिज्ञापत्रही न्यायालयात सादर केले.
वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, काही पोस्ट हटवण्यात आल्या असल्या तरी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील दोन पोस्टमध्ये अजूनही अभिषेक यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. तसेच, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरही त्यांच्या परवानगीशिवाय व्यावसायिक हेतूने त्यांच्या प्रतिमेचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
दरम्यान, मेटा आणि अॅमेझॉन यांनी न्यायालयात सांगितले की, अभिषेक यांची प्रतिमा मलिन करणारे सर्व संबंधित पोस्ट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवले जातील. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
याआधीच्या सुनावणीवेळी संबंधित यूआरएलचे स्क्रीनशॉट याचिकेसोबत जोडले नसल्याने न्यायालयाने कोणताही आदेश देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आवश्यक पुराव्यांसह अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.
अभिषेक शर्मा यांनी आपल्या ‘पर्सनॅलिटी राइट्स’चे संरक्षण तसेच त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले एआय आधारित बनावट साहित्य हटविण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या अभिषेक भारतीय संघासोबत असून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत सहभागी आहेत.
