लंडन गोल्फ चॅम्पियनशिपमध्ये दीक्षा डागरवर भारताच्या आशा

लंडन गोल्फ चॅम्पियनशिपमध्ये दीक्षा डागरवर भारताच्या आशा

टीम न्यूज डंका महाराष्ट्र

भारतीय गोल्फपटू दीक्षा डागर लंडन येथे होणाऱ्या २० लाख डॉलर (२ दशलक्ष डॉलर) बक्षीस रकमेच्या प्रतिष्ठेच्या लंडन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार आहे. ६ ते ९ ऑगस्टदरम्यान हर्टफोर्डशायर येथील सेंच्युरियन क्लबमध्ये ही स्पर्धा रंगणार असून, लेडीज युरोपियन टूर (एलईटी)च्या युनायटेड किंग्डम टप्प्यातील ही अखेरची स्पर्धा आहे.

या स्पर्धेत दीक्षासह अदिती अशोक, प्रणवी उर्स आणि नवोदित अवनी प्रशांत या भारतीय खेळाडूही सहभागी होणार आहेत. एकूण १२० खेळाडू विजेतेपदासाठी स्पर्धेत उतरणार असून, भारतीय खेळाडू एलईटी हंगामाच्या अखेरीस दमदार कामगिरी करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील.

दोन वेळा एलईटी विजेतेपद पटकावणारी दीक्षा डागर यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये गणली जाते. गेल्या आठवड्यात एआयजी महिला ओपनमध्ये कट गाठण्यात अपयश आले असले तरी ‘रेस टू कोस्टा डेल सोल’ गुणतालिकेत ती आठव्या स्थानावर असून, सर्वाधिक मानांकन मिळालेली भारतीय गोल्फपटू आहे. या स्पर्धेत ती आपल्या तिसऱ्या एलईटी विजेतेपदाच्या शोधात उतरणार आहे.

पाच वेळा एलईटी विजेती अदिती अशोक यंदा अपेक्षित फॉर्ममध्ये दिसली नसली, तरी या स्पर्धेत पुनरागमन करून दमदार खेळ करण्याचा तिचा प्रयत्न असेल. प्रणवी उर्स आणि अवनी प्रशांत यांनीही यंदाच्या हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली असून, दोघीही ‘ऑर्डर ऑफ मेरिट’च्या अव्वल ५० खेळाडूंमध्ये स्थान टिकवून आहेत.

लंडन चॅम्पियनशिप सलग सहाव्या वर्षी सेंच्युरियन क्लबमध्ये होत असून, ७२ होल्समध्ये विजेतेपदासाठी चुरशीची लढत रंगणार आहे. ३६ होल्सनंतर अव्वल ६० व्यावसायिक खेळाडू आणि समान गुण असलेले खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

गेल्या वर्षी विजेतेपद पटकावणारी जर्मनीची लॉरा फनफस्टक यंदा मातृत्व रजेवर असल्याने स्पर्धेत सहभागी होणार नाही. त्यामुळे इंग्लंडची स्टार आणि जगातील सहाव्या क्रमांकाची गोल्फपटू चार्ली हल ही या स्पर्धेतील प्रमुख दावेदार मानली जात आहे.

Exit mobile version