28.2 C
Mumbai
Wednesday, August 5, 2026
घरसंपादकीयविरोधकांना ऐकवेल मोटाभाईचा जवाब?

विरोधकांना ऐकवेल मोटाभाईचा जवाब?

Google News Follow

Related

गुमशुदा, लापता असल्याचा दावा करत विरोधक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शोधतायत. त्यांनी संसदेत यावे, २० जुलै रोजी झालेल्या पोलिस कारवाईबाबत निवेदन करावे, अशी मागणी करतायत. हे निवेदन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत संसदेचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतलेली आहे. अमित शहा जवाब दो अशी मागणी करत, विरोधकांनी आज संसदेवर मोर्चा काढला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके आणि सौरव दास यांनी सुद्धा विरोधकांच्या सुरात सूर मिसळलेला आहे. अमित शहा शांत आहेत, याचा अर्थ ते शांत बसलेत असा अर्थ विरोधकांनी काढलेला दिसतो. शहा नेमके काय करतायत, हे ठामपणे सांगता येत नसले तरी त्याचा अंदाज बांधणे कठीण नाही.

कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चात पॅलेट गनचा वापर झाला, विद्यार्थ्यांवर बळाचा प्रयोग झाला, हा विरोधकांचा आरोप आहे. विरोधकांच्या दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयही पॅलेट गन वापरू नका असे सांगत नसून पॅलट गन कोणत्या परिस्थितीत वापरावी याची मार्गदर्शक तत्वे निश्चित कऱण्यावर भर देते आहे. पॅलेट गनबाबत केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचा खुलासा विरोधी पक्षातील नेत्यांना हवा आहे. अभिजीत दिपकेचे तर असे म्हणणे आहे, जंतर मंतरवर झालेल्या मोर्चात दाखलेबाज गुंड सहभागी होणे, हे अमित शहा यांचे अपयश आहे.

सरकार अधिवेशनाच्या आधीपासून नारीशक्ती वंदन, लोकसभा मतदार संघ पुनर्रचना आणि सुधारित एफसीआरए विधेयक आणण्यासाठी फिल्डींग लावते आहे. अमित शहा यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. सुधारीत एफसीआरए विधेयकासाठी फक्त साध्या बहुमताची गरज असली नारीशक्ती वंदन आणि डिलिमिटेशन विधेयकाच्या मंजूरीसाठी दोन तृतियांश संख्याबळाची सरकारला गरज आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा या तिन्ही विधेयकांना विरोध असतानाही सरकार हे शक्य करून दाखवेल अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू झाले. त्यानंतर संसदेचे कामकाज बंद पाडायला विरोधकांना निमित्त मिळाले. आता विरोधक अमित शहा यांच्या खुलाशावर अडून बसले आहेत.

आज संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रिजिजू अमित शहा यांना भेटले. बहुधा नारीशक्ती वंदन आणि डिलिमिटेशन विधेयके आता विशेष अधिवेशनात मार्गी लागतील अशी शक्यता आहे. मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात संसदेतील गोंधळ ही अधिवेशन काळातील स्थायी परीस्थिती जरी असली तरी सरकार कायम वरचढ असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. यंदा परिस्थिती थोडी वेगळी आहे. सरकार बॅकफूटवर गेलेले दिसते. त्यामुळे अमित शहा संसदेत बोलणार कि, त्या शिवाय हे अधिवेशन पुढे सरकेल, की पूर्णपणे हे अधिवेशन असेच पाण्यात जाणार असे अनेक तर्क केले जात आहेत.

हे ही वाचा:

लंडन गोल्फ चॅम्पियनशिपमध्ये दीक्षा डागरवर भारताच्या आशा

श्रीलंकेत टीम इंडियाची दमदार एंट्री; १५ ऑगस्टपासून कसोटी रणसंग्राम

सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीत तेजी

आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचा महागाईचा अंदाज ५% वर

२० जुलैच्या मोर्चाबाबत बरीच माहिती समोर आली आहे. बरीच येते आहे. आंदोलनात २८७३ दाखलेबाज गुंड शिरले होते. सोशल मीडियाची ४०० अकाऊंट्स पाकिस्तानातून सुरू होती, ही माहिती तर अगदी सुरूवातीच्या काळात समोर आली. आज एका वृत्तवाहीनीने सोशल मीडियाशी संबंधित बराच तपशील उघड केला आहे. यात कंटेट व्हायरल करण्यासाठी अनेक फेक अकाऊंट आणि बॉट्सचा वापर करण्यात आला. बोगस खाती कोणाची आहेत, ती कुठून चालवली जातात, देशातून की विदेशातून, सोशल मीडिया अकाऊंटचे आयपी एड्रेस, सर्व्हर, लॉग इन हिस्ट्री आदी तपशील दिल्ली पोलिसांनी मेटा, गुगल आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कडून मागवला आहे.

या माहितीचे फॉरेन्सिक ऑडीट केले जाणार आहे. सोशल मीडियाशी संबंधित काही खासगी कंपन्यांचा समावेश आहे का, याचाही शोध घेतला जातो आहे.

दिपके म्हणतोय, ‘आंदोलनात गुंड आले होते तर हे अमित शहा यांचे अपयश आहे. विदेशातून पैसा आला असेल. तर तेही अमित शहा यांचे अपयश आहे.’ त्याचे म्हणणे बरोबर आहे. हे गुंड कोणी बोलावले होते, विदेशी पैसा कोणाच्या खात्यात आला, कसा आला, याचा तपशील शहा यांना सिद्ध करावा लागेल. तेव्हा आरोप करणाऱ्यांच्या तंगड्या त्यांच्या गळ्यात घालता येतील. बरीच माहिती त्यांच्या हाती आलीही असणार, जुनेदच्या बिर्याणीच्या हिशोबापासून दिपकेच्या अमेरिकी मुक्कामापर्यंत. संसदेचे अधिवेशन सुरू असताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे दोन वेळा संसदेच्या इमारतीत आले, त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट हवा पाण्याच्या गप्पा मारण्यासाठी निश्चितपणे झाली नसणार.

भारतात जो खेळ खेळला जातो आहे, तो खेळणारे खेळाडू ऐरेगैरे निश्चितपणे नाहीत. कॉकरोच जनता पार्टीचा प्रवक्ता सौरव दास म्हणाला आहे, ‘आम्ही निवडणुका लढणार नाही. दबाव गट म्हणून काम करू.’ कॉकरोच आता अर्थकारण आणि रोजगाराचा विषय घेऊन आंदोलन करणार आहेत. आम्ही जबाबदारी घेणार नाही, लोकनियुक्त सरकारच्या छाताडावर बसू आणि आम्हाला हवे ते करून घेऊ, अशी ही रणनीती आहे. ते निवडणुका लढणार नाहीत, कारण त्यांना ठाऊक आहे, ते जिंकू शकत नाहीत. त्यांना फक्त भाजपाला धक्के देत राहायचे आहे, जेणे करून केंद्र सरकार कमजोर होईल, डगमगेल आणि एक दिवस कोसळेल. अर्थात हा त्यांचा समज आहे.

पावसाळी अधिवेशनात एफसीआरएबाबत फैसला होणार याबाबत अमेरिका इतकी ठाम आहे की, पुन्हा एकदा अमेरिकी काँग्रेसमन रिले मूर यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. ‘हे विधेयक म्हणजे भारतातील ख्रिस्ती समुदायावर करण्यात आलेला उघड हल्ला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास सरकारला चर्च आणि धार्मिक संस्थांवर नियंत्रण मिळेल. हे विधेयक दोन्ही देशातील तणावाचा मुद्दा बनू शकेल’, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मूर हे रिपल्बिकन पार्टीचे जेष्ठ नेते आहेत. ट्रम्प यांचे समर्थक आहेत. त्यांनी हा इशारा दिला आहे, याचा अर्थ आपण समजू शकतो.

देशात जे अराजक दिसते आहे, त्याच्या मूळाशी हे विधेयक आणण्याचा सरकारचा मनसुबा उधळण्याचे षडयंत्र असू शकते. अमेरिकेने असे प्रयोग या आधीही भारतासह जगभरात केलेले आहेत. आता मुद्दा असा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ही कोंडी फोडणार कशी? गेम मोठा आहे, याची केंद्र सरकारला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे अमित शहा शांत बसून काम करतायत. एका गोष्टीबद्दल मला खात्री आहे की, ते माहितीच्या ढीगाऱ्यावर बसले आहेत. आयबी आणि रॉ कडून एव्हाना त्यांना ढीगभर माहिती मिळाली असणार. या खेळाचा रिंग मास्टर कोण? सूत्र हलवण्याचे काम कोण करतोय? स्क्रिप्ट कोणाची? मुख्य भूमिका कोणाची? सगळे त्यांच्यापर्यंत पोहोचले असणार अगदी बारीक सारीक तपशीलासह.

दिपके महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर राज्याच्या सत्ताधारी पक्षातील एक आमदार त्याच्या घरी जातो आणि त्याचा सत्कार करतो, हेही त्यांच्या नजरेतून सुटले नसणार. सगळ्या कड्या जुळवल्या की, कोणाचे काय करायचे, याची रणनीतीही तयार होऊ शकेल.

सगळे दिवस सारखे नसतात. झारखंडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनातील उपोषणकर्ता देवेंद्र मोहोतो याच्या सोबत सोनम वांगचूक यांनी व्हीडीयो कॉलवर चर्चा केली. जयपाल सिंह मुंडा स्टेडीयम येथे उपोषण सुरू आहे. अन्नपाणी सोडणाऱ्या या उपोषणकर्त्यांना वांगचूक यांनी आवाहन केले की, ‘पाणी सोडू नका. पाणी पिणे आवश्यक आहे.’ इथे दिपके पोहोचला नाही, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या मित्र पक्षाचे नेते याबाबत एक शब्दही बोलायला तयार नाहीत. हे चित्र त्या विद्यार्थ्यांचे डोळे उघडणारे, ज्यांना वाटते की जंतर मंतरवरील आंदोलन आपल्या भल्यासाठी होते.

आज दिपके जे करतो आहे, कधी काळी राकेश टिकैत, त्या आधी कन्हैया कुमार हेच करत होते. महाराष्ट्रात जरांगे होता. आज तिघेही भंगारात पडले आहेत. अमित शहा तिथेच आहेत. मजबूत आहेत.

आज जे लोक अमित शहा यांना गुमशुदा आणि लापता म्हणून हिणवतायत, अशांचे किती तरी वेळा संसदेत अमित शहा यांनी वस्त्रहरण केले आहे. आज ५ ऑगस्टच्या दिवशी तरी विरोधकांना याचा विसर पडायला नको होता. ते विचार केल्यानंतर बोलत नाहीत, माहिती हाती घेऊन, पूर्ण विचार करून ते बोलतात. अमित शहा जेव्हा केव्हा संसदेत बोलतील तेव्हा विरोधकांसाठी तो कयामत का दिन असेल.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा