अनधिकृत स्पर्धांवर पीसीबीचा चाप

अनधिकृत स्पर्धांवर पीसीबीचा चाप

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माजी क्रिकेटपटूंना अनधिकृत परदेशी क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होण्याबाबत कडक इशारा दिला आहे. आवश्यक परवानगी न घेता झांबियामध्ये सुरू असलेल्या २०व्या एशियन लिजेंड्स लीगमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

पीसीबीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या स्पर्धेला अधिकृत मान्यता दिलेली नाही. तसेच, झांबिया क्रिकेट युनियनकडूनही या स्पर्धेला मंजुरी मिळालेली नसल्याने त्यात सहभाग घेणे आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन ठरते.

आयसीसीच्या नियमानुसार, कोणत्याही परदेशी क्रिकेट स्पर्धेत खेळण्यापूर्वी संबंधित खेळाडूंनी आपल्या देशाच्या क्रिकेट बोर्डाकडून ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (एनओसी) घेणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर संबंधित क्रिकेट बोर्डाने शिस्तभंगाची कारवाई करणे आवश्यक आहे.

पीसीबीने स्पष्ट केले की, बोर्डाची पूर्वपरवानगी न घेता कोणताही खेळाडू अनधिकृत स्पर्धेत सहभागी झाल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अशा खेळाडूंना दोन वर्षांसाठी पीसीबीकडून एनओसी मिळणार नाही, त्यामुळे त्यांना कोणत्याही मान्यताप्राप्त परदेशी क्रिकेट लीग किंवा स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

याशिवाय, संबंधित व्यक्तींना दोन वर्षांसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) तसेच क्रिकेटशी संबंधित कोचिंग, मार्गदर्शन, सल्लागार किंवा इतर कोणत्याही जबाबदाऱ्यांसाठी अपात्र ठरवले जाईल.

पीसीबीने आपण आयसीसीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगत, विद्यमान आणि माजी क्रिकेटपटूंनी परदेशातील कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी आवश्यक एनओसी घेणे अनिवार्य असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Exit mobile version