श्रीलंकेत टीम इंडियाची दमदार एंट्री; १५ ऑगस्टपासून कसोटी रणसंग्राम

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेत; कसोटी मालिकेची उलटीगणती सुरू

श्रीलंकेत टीम इंडियाची दमदार एंट्री; १५ ऑगस्टपासून कसोटी रणसंग्राम

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर संघाच्या श्रीलंका दौऱ्याचा व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली.

या व्हिडिओमध्ये भारतीय संघ भारतातून श्रीलंकेकडे रवाना होताना तसेच कोलंबो विमानतळावर पोहोचल्यानंतर संघ बसने हॉटेलकडे जाताना दिसत आहे. कर्णधार शुभमन गिल, ऋषभ पंत, कुलदीप यादव यांच्यासह संघातील सर्व खेळाडू उत्साही वातावरणात दिसून आले. प्रवासादरम्यान खेळाडूंनी हलक्या-फुलक्या गप्पा आणि मस्ती करत दौऱ्याची सुरुवात केली. यष्टिरक्षक ध्रुव जुरेल कॅमेऱ्यात खास क्षण टिपताना दिसला.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार असून, दुसरा कसोटी सामना २३ ऑगस्टपासून कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर रंगणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ ७ ऑगस्टपासून सुरू होणारा तीन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे.

दरम्यान, मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरता न आल्यामुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी जम्मू-काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज आकिब नबी याची संघात निवड करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरकडून भारतीय कसोटी संघात स्थान मिळवणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या आकिबसमोर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची छाप पाडण्याची मोठी संधी असणार आहे.

श्रीलंका कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन आणि आकिब नबी.

Exit mobile version