भारताचा माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांनी इंग्लंडविरुद्ध जून महिन्यात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेआधी विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
बीसीसीआयच्या अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, ३६ वर्षीय विराट कोहलीने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, बोर्डाकडून त्याला हा निर्णय पुन्हा विचारात घेण्याची विनंती करण्यात आली आहे, कारण २० जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याच्या माध्यमातून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवीन फेरीचा प्रारंभ होणार आहे.
सिद्धूंनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, “विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयाने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. त्याचा हेतू चांगला असला तरी काळ आणि परिस्थिती योग्य नाही. इंग्लंड दौरा हा भारतासाठीच नव्हे तर इतर कसोटी देशांसाठीही अत्यंत कठीण मानला जातो.”
सिद्धूंनी कोहलीला ‘इंग्लंडमधील भारताचा तेजस्वी योद्धा’ असं संबोधलं. त्यांनी सांगितलं की, “रोहित शर्मा आधीच कसोटी संघातून बाहेर गेला आहे. अशा स्थितीत कोहलीची अनुपस्थिती भारतीय संघासाठी अनुभवाच्या अभावामुळे गंभीर ठरू शकते.”
ते पुढे म्हणाले, “कोहली इंग्लंडसारख्या कठीण परिस्थितीत आपल्यासाठी सर्वांत महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. अनुभवाच्या अभावाने आपण इंग्लंडमध्ये कमी ताकदीनं उतरू शकतो.”
२०११ साली कसोटीत पदार्पण करणाऱ्या कोहलीने आजवर १२३ कसोटी सामने खेळून ९२३० धावा केल्या आहेत, ज्यात त्याची सरासरी ४६.८५ आहे. त्याने ६८ कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्वही केले आहे. कोहलीच्या नेतृत्वगुणांमुळे भारताने घरच्या मैदानावर तसेच परदेशातही कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.







