30.1 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरस्पोर्ट्समुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायरन पोलार्ड

मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायरन पोलार्ड

Google News Follow

मुंबई इंडियन्सने वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. मुंबई इंडियन्सने शनिवारी अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही घोषणा केली. गेल्या १६ वर्षांपासून मुंबई इंडियन्सशी जोडलेल्या पोलार्डसाठी ही नवी जबाबदारी म्हणजे सन्मानाची बाब असल्याची भावना त्याने व्यक्त केली.

वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी, २०१० मध्ये पोलार्ड मुंबई इंडियन्सशी जोडला गेला. फलंदाजी आणि गोलंदाजीतील अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याने संघाच्या पाच आयपीएल विजेतेपदांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. २०२२ मध्ये खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. गेल्या चार हंगामांत फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर आता त्याच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर पोलार्ड म्हणाला, “मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मुंबई इंडियन्स हा माझ्या आयुष्याचा आणि क्रिकेट कारकिर्दीचा अविभाज्य भाग आहे. या संघाशी, खेळाडूंशी आणि चाहत्यांशी असलेले माझे नाते खूप महत्त्वाचे आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल नीता अंबानी, आकाश अंबानी आणि संपूर्ण मुंबई इंडियन्स परिवाराचा मी आभारी आहे.”

संघाची गौरवशाली परंपरा पुढे नेणे, युवा प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि चाहत्यांना आनंद साजरा करण्याच्या आणखी संधी उपलब्ध करून देणे, हे आपले उद्दिष्ट असल्याचेही पोलार्डने स्पष्ट केले.

मुंबई इंडियन्सच्या सहमालक नीता अंबानी यांनी पोलार्डच्या नियुक्तीचे स्वागत केले. त्या म्हणाल्या की, पोलार्डने खेळाडू म्हणून अनेक अविस्मरणीय क्षण दिले असून प्रशिक्षक म्हणूनही त्याने आपला अनुभव, उत्साह आणि क्रिकेटविषयीची सखोल समज दाखवून दिली आहे. मुंबई इंडियन्सच्या संस्कृतीची आणि संघाच्या जर्सीचे महत्त्व जाणणारा पोलार्ड नव्या भूमिकेतही यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टी-२० क्रिकेटमध्ये पोलार्डचा दबदबा

टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या पोलार्डने आंतरराष्ट्रीय आणि विविध लीग क्रिकेटमध्ये मिळून ७५४ सामने खेळले आहेत. त्याने ६७१ डावांत १४,९९९ धावा केल्या असून, त्यात २ शतके आणि ७१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट १५० पेक्षा अधिक असून, गोलंदाज म्हणून त्याच्या नावावर ३४१ बळी आहेत. विविध लीगमध्ये तो अद्याप खेळाडू म्हणून सक्रिय आहे.

मुंबई इंडियन्सने अखेरचे आयपीएल विजेतेपद २०२० मध्ये पटकावले होते. आता पोलार्डसमोर संघाला सहावे विजेतेपद मिळवून देण्याचे आव्हान असेल. खेळाडू आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्सशी दीर्घकाळ जोडलेल्या पोलार्डच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर येतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा