२५ वर्षांपूर्वी ईडन गार्डन्सवर भारताने टेस्ट क्रिकेटमधील सर्वात संस्मरणीय विजयांपैकी एक मिळवला होता. २००१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेल्या त्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करण्यात आल्या. या खास सत्रात सौरव गांगुलीही व्हर्च्युअली सहभागी झाले होते.
त्या विजयाचे कर्णधार असलेल्या गांगुलींनी नम्रपणे प्रतिक्रिया देताना म्हटले, “ती किस्मत होती. जणू एखादी परीकथा होती. मी काही विशेष केले नाही, सगळं आपोआप घडलं.”
या ऐतिहासिक सामन्यात गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हरभजन सिंगनेही भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “मी माझ्या आई-वडिलांमुळे या जगात आलो, पण ईडन गार्डन्स नसता तर मी काय झालो असतो, हे मला माहीत नाही.”
भज्जीने त्या सामन्यात संधी कशी मिळाली याची आठवण सांगितली. “अनिल कुंबळे जखमी झाले होते. कोच जॉन राइटला विकेट घेणारा गोलंदाज हवा होता. नेट्समध्ये सगळ्यांना गोलंदाजी करायला सांगितलं आणि मला निवडलं. गांगुलींनीही माझ्यावर विश्वास दाखवला,” असे तो म्हणाला.
सामन्याच्या शेवटच्या दिवसाबद्दल बोलताना भज्जी म्हणाला, “पाचव्या दिवशी आमच्याकडे चांगला स्कोअर होता. ऑस्ट्रेलिया कडवी लढत देणार हे माहित होतं. ड्रेसिंग रूममध्ये डिक्लेरेशन कधी करायचं यावर चर्चा सुरू होती. शेवटी ७४ ते ७६ ओव्हर्स पुरेसे ठरतील असं वाटलं. राहुल द्रविड, लक्ष्मण आणि इतरांच्या अप्रतिम खेळामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला.”
त्या संघाचा भाग असलेले वेंकटेश प्रसाद यांनीही एक प्रसंग आठवला. “मी एक कॅच सोडला होता. प्रेक्षकांमुळे माझं लक्ष विचलित झालं. तो क्षण माझ्यासाठी खूप कठीण होता. कमेंटेटर्सही सतत त्यावर बोलत होते. कोच जॉन राइट यांनी मला सांगितलं—असे कॅच पकडायलाच हवेत,” असे त्यांनी सांगितले.
जहीर खाननेही त्या सामन्याचा टर्निंग पॉईंट सांगितला. “चौथ्या दिवशी आम्ही ठरवलं की एकही विकेट द्यायची नाही. लक्ष्मण आणि द्रविड यांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि सामना आमच्या बाजूने वळवला. त्या टप्प्यानंतर आम्ही सामना हरू शकत नव्हतो,” असे जहीर म्हणाला.







