28.6 C
Mumbai
Tuesday, August 18, 2026
घरस्पोर्ट्सकुस्तीच्या आखाड्यात गीतिकांची ‘दंगल’!

कुस्तीच्या आखाड्यात गीतिकांची ‘दंगल’!

अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला

Google News Follow

Related

कुस्तीचा आखाडा म्हटलं की हरियाण्याच्या मातीचा दरवळ जाणवतो. याच मातीतून भारताच्या महिला कुस्तीला नवी ओळख मिळवून देणाऱ्या गीतिका जाखड यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि दमदार कामगिरीच्या जोरावर इतिहास घडवला. अवघ्या १३व्या वर्षी आखाड्यात उतरलेल्या गीतिका यांनी पुढे देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मानांपैकी एक असलेल्या अर्जुन पुरस्कारावर आपले नाव कोरले.

१८ ऑगस्ट १९८५ रोजी हरियाणातील हिसार जिल्ह्यातील अग्रोहा गावात गीतिका यांचा जन्म झाला. घरातच कुस्ती आणि क्रीडेला पोषक वातावरण होते. आजोबा स्वतः कुस्तीपटू, तर वडील क्रीडा अधिकारी. त्यामुळे आखाड्याची हाक गीतिकांना लहानपणापासूनच ऐकू येत होती. वयाच्या १३व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा आखाड्यात पाऊल ठेवले आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही.

अवघ्या १५व्या वर्षी ‘भारत केसरी’ किताब पटकावून त्यांनी आपल्या क्षमतेची झलक दाखवली. विशेष म्हणजे पुढील नऊ वर्षे त्यांनी हा किताब आपल्या नावावर कायम ठेवला. महिला कुस्तीमध्ये हे त्यांचे वर्चस्वच म्हणावे लागेल.

राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धांमध्येही गीतिकांचा दबदबा कायम राहिला. २००३ आणि २००५ मध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले, तर २००७ मध्ये रौप्यपदकाची कमाई केली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना ‘भीम पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.

मात्र गीतिका जाखड यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा ठरला तो २००६ सालचा. कुस्तीच्या क्षेत्रातील भरीव योगदानासाठी भारत सरकारने त्यांना ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान केला. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला कुस्तीपटू ठरल्या.

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही गीतिकांनी भारताचा झेंडा उंचावला. २००६ मध्ये रौप्यपदक, तर २०१४ मध्ये कांस्यपदक त्यांनी पटकावले. २००७ मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.

त्यांच्या कामगिरीचा गौरव २००९ मध्ये कल्पना चावला उत्कृष्टता पुरस्काराने करण्यात आला. तर २०११ मध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या सर्वात कमी वयाच्या कुस्तीपटूचा मान त्यांनी मिळवला.

यानंतर २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकत गीतिकांनी पुन्हा एकदा आपल्या अनुभवाची आणि ताकदीची प्रचिती दिली. आखाड्यातील ही विजयी वाटचाल इथेच थांबली नाही. हरियाणा पोलिस दलात उपअधीक्षक (डीएसपी) पदावर कार्यरत असतानाही त्यांनी कुस्तीशी नाते कायम ठेवले.

२०१९ मध्ये वर्ल्ड पोलिस गेम्समध्ये ६० किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावत त्यांनी वय आणि जबाबदाऱ्या यांच्यापेक्षा जिद्द मोठी असते, हे दाखवून दिले.

हरियाण्याच्या मातीतून सुरू झालेला गीतिका जाखड यांचा प्रवास केवळ पदकांचा नाही; तो भारतीय महिला कुस्तीच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या पर्वाचा प्रवास आहे. आखाड्यात उतरलेल्या एका १३ वर्षांच्या मुलीने पुढे अर्जुन पुरस्कारापर्यंत मजल मारत अनेक मुलींसाठी कुस्तीचा मार्ग खुला केला. त्यांची कारकीर्द आजही भारतीय महिला कुस्तीपटूंसाठी प्रेरणेचा आखाडा ठरते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा