भारताची तिरंदाज शीतल देवी हिने ऐतिहासिक कामगिरी करत शनिवार, २७ सप्टेंबर रोजी पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. ग्वांगजू येथे झालेल्या महिला कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात (women’s compound individual category) तुर्कीयेच्या अव्वल क्रमांकाच्या ओझनूर क्युर गिर्डीचा १४६- १४३ असा पराभव केला. या स्पर्धेत शीतलचे हे तिसरे पदक आहे. तिने यापूर्वी तोमन कुमारसोबत मिश्र संघात कांस्यपदक जिंकले होते, त्यांनी ग्रेट ब्रिटनच्या जोडी ग्रिनहॅम आणि नाथन मॅकक्वीन यांना १५२-१४९ असे हरवले होते. कंपाउंड महिला ओपन सांघिक स्पर्धेत, शीतल आणि सरिता यांनी अंतिम फेरीत तुर्कीयेकडून पराभूत झाल्यानंतर रौप्यपदक जिंकले.
एकेरीचा अंतिम सामना तणावपूर्ण ठरला, परंतु शीतल हिने संपूर्ण वेळ संयम राखला. सुरुवातीला सामना २९-२९ असा बरोबरीत होता, त्यानंतर तिने १० सेकंदांची हॅटट्रिक करत आघाडी घेतली आणि दुसऱ्या एंडमध्ये यश मिळवले. तिसरा एंड पुन्हा २९- २९ असा बरोबरीत सुटला. शीतलने चौथा एंड एका गुणाने गमावला असला तरी, तिने ११६- ११४ असा आपला अग्रक्रम कायम ठेवला. शीतल हिने सुवर्णपदक जिंकले. ही विजेतेपदाची लढत २०२३ च्या पिल्सन वर्ल्ड चॅम्पियनशिपची पुनरावृत्ती होती, जिथे गिर्डीने शीतलचा १४०-१३८ असा थोडक्यात पराभव केला होता. यावेळी, शीतलने दोन वर्षांपूर्वीच्या तिच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी खेळी उलथवून टाकली.
ओपन टीम फायनलमध्ये, शीतल आणि सरिता यांनी जोरदार सुरुवात केली, पण त्यांना १४८- १५२ ने पराभव पत्करावा लागला आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय जोडीने जोरदार सुरुवात केली आणि सुरुवातीच्या सामन्यात तुर्की जोडी ओझनूर क्युर गिर्डी आणि बुर्सा फातमा उन यांना ३८-३७ असे हरवले. भारतीयांनी त्यांच्या पहिल्या चार बाणांमधून तीन १० गुण मिळवले, तर तुर्कीला फक्त एकच दहा गुण मिळवता आले. तथापि, तुर्की तिरंदाजांनी दुसऱ्या एंडला तीन दहा आणि एक नऊसह पुनरागमन केले आणि भारताला एका गुणाने मागे टाकले आणि एकूण ७६-७६ अशी बरोबरी साधली.
हे ही वाचा..
वांगचूकला अटक, ‘गीतांजली’च्या भोवतीही संशयाचे धुके
सोनम वांगचुक यांच्या पाकिस्तान संबंधांची चौकशी सुरू; बांगलादेश भेटीवरही प्रश्नचिन्ह
बरेली दंगल प्रकरणी मौलाना तौकीर रझा अटकेत
… म्हणून काँग्रेस नेत्याला ठोठावला १.२४ अब्ज रुपयांचा दंड!
तिसऱ्या एंडमध्ये भारतीय जोडीला एक १०, दोन ९ आणि एक ८ असे एकूण ३६ गुण खात्यात जमवता आले. दुसरीकडे तुर्की जोडीने अधिक सातत्यपूर्ण कामगिरी केली, त्यांनी एक १० आणि तीन ९ सह ३७ गुण मिळवत एक गुणाची आघाडी घेतली. शेवटच्या एंडमध्ये गिर्डी आणि उन यांनी ४० पैकी ३९ गुण जमवले आणि भारतीय खेळाडूंनी ३६ गुण मिळवले. यामुळे तुर्कीने चार गुणांच्या फरकाने सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.







