वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) २०२५ च्या अंतिम सामन्यात एक थक्क करणारा आणि क्रिकेट चाहत्यांना इतिहासाची आठवण करून देणारा संयोग घडला. १३ जून रोजी, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार टेंबा बावुमाचा महत्त्वाचा झेल सोडला.
हा झेल केवळ चुकला नाही, तर स्मिथच्या बोटालाही दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावं लागलं. स्मिथच्या या चुका दक्षिण आफ्रिकेसाठी वरदान ठरली. जीवनदान मिळाल्यानंतर टेंबा बावुमाने जबरदस्त अर्धशतक ठोकत एडन मार्करमसह नाबाद १४३ धावांची भागीदारी रचली आणि दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं.
विशेष बाब म्हणजे, याच तारखेला – १३ जून १९९९ रोजी – हेच दोन संघ एकमेकांसमोर होते आणि त्यावेळीसुद्धा एक असाच निर्णायक झेल सुटला होता.
तो सामना होता १९९९ चा विश्वचषक. हेडिंग्ले मैदानावर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २७१ धावा केल्या होत्या. हर्शल गिब्सने १३४ चेंडूत १०१ धावांची शानदार खेळी केली होती.
ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा पाठलाग सुरू केला, पण ४८ धावांतच तीन गडी गमावले होते. स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंग यांनी डाव सावरला. आणि याचवेळी गिब्सकडून स्टीव्ह वॉचा एक झेल चुकवला गेला. त्या संधीचा फायदा घेत वॉने १२० धावांची नाबाद खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
त्याच विश्वचषकात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेची गाठ अर्धाअंतिम सामन्यात पडली. सामना बरोबरीत राहिला, पण लीग फेज़च्या आधारे ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पोहचला आणि तिथे पाकिस्तानला हरवत विश्वविजेता ठरला.
आज २६ वर्षांनी, पुन्हा एकदा १३ जून रोजी, पुन्हा तेच दोन संघ आणि पुन्हा एक निर्णायक झेल – इतिहास जणू स्वतःची पुनरावृत्ती करत असल्याचा अनुभव या सामन्यात आला.







