29.2 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरस्पोर्ट्सआशियाई पॅरा गेम्समध्ये भारताचे पदकांचे शतक पूर्ण!

आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताचे पदकांचे शतक पूर्ण!

Google News Follow

आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये भारताच्या खेळाडूंनी पाचव्या दिवशी सुवर्ण आणि रौप्यपदकांची कमाई करत स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली. तिरंदाजी, बॅडमिंटन, धावण्याच्या स्पर्धा आणि भालाफेक अशा विविध क्रीडा प्रकारांत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या पदकांच्या जोरावर भारताने स्पर्धेत पदकांचे शतक पूर्ण केले.

तिरंदाजांची सुवर्णकामगिरी

पुरुषांच्या रिकर्व सांघिक तिरंदाजी प्रकारात हरविंदर सिंह आणि विजय सुंडी या भारतीय जोडीने चीनवर ५-१ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. पहिला सेट ३५-३५ असा बरोबरीत सुटल्यानंतर भारतीय जोडीने पुढील दोन्ही सेट जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले.

मात्र, महिला रिकर्व दुहेरीच्या सुवर्णपदकाच्या लढतीत भावना आणि पूजा या भारतीय जोडीला चीनकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

बॅडमिंटनमध्ये भारताची पदकांची लयलूट

बॅडमिंटनमध्ये नितेश कुमारने पुरुषांच्या एसएल३ एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्याच प्रमोदला २१-१८, २१-१६ असे पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. प्रमोदला रौप्यपदक मिळाले.

एसएल४ प्रकारात नवीन शिवकुमारने इंडोनेशियाच्या फर्डी सेतियावानला २१-९, २१-१७ असे हरवत सुवर्णपदकावर नाव कोरले.

महिलांच्या एसयू५ एकेरीत थुलसिमथी मुरुगेसन हिला चीनच्या यांग किउक्सियाकडून १८-२१, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिला रौप्यपदक मिळाले. महिला एकेरीच्या एसएच६ प्रकारात नित्या श्री हिलाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

धावण्याच्या स्पर्धेत विश्वविक्रम

भारताच्या संदीप कुमारने पुरुषांच्या ४०० मीटर टी६४ स्पर्धेत ५२.२८ सेकंदांची वेळ नोंदवत विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. अजय कुमारने ५३.६१ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले.

पुरुषांच्या १५०० मीटर टी४६ स्पर्धेत प्रमोदने ४ मिनिटे ९.६५ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. महिलांच्या लांब उडी टी४७ प्रकारात निमिषा चक्कुंगलपरम्बिल हिनेही रौप्यपदक मिळवले.

भालाफेकीत हॅनीचा विश्वविक्रम

भालाफेकपटू हॅनीने एफ३७ प्रकारात अखेरच्या प्रयत्नात ६०.४९ मीटर अंतरावर भालाफेक करत विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. भारतीय खेळाडूंच्या या दमदार कामगिरीमुळे आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताच्या पदकतालिकेत आणखी भर पडली.

विश्वविक्रम, सुवर्णपदके आणि पदकांचे शतक यामुळे आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा