दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटीत खेळलेल्या टेस्ट सामन्यात भारतीय संघाला ४०८ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. धावांच्या फरकाने हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे. भारतासमोर विजयासाठी ५४९ धावांचे लक्ष्य होते, परंतु संघ अवघ्या १४० धावांवरच गडगडला. या पराभवासह भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका ०-२ ने गमावली.
ही दक्षिण आफ्रिकेने भारतात जिंकलेली अवघी दुसरीच मालिका आहे. याआधी, २०००मध्ये दक्षिण आफ्रिकेने हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली भारतात विजयश्री मिळविली होती, पण त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी २५ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. शिवाय, हा भारताचा गेल्या दोन वर्षातील भारतात झालेला दुसरा मालिका पराभव आहे. याआधी, न्यूझीलंडविरुद्ध भारताला ०-३ अशी हार पत्करावी लागली होती. हा भारतीय संघाचा भारतात झालेला सर्वात मोठा पराभवही ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरला ३४२ धावांनी भारताचा पराभव झाला होता.
भारतीय संघाने पाचव्या दिवसाची खेळाची सुरुवात २ बाद २७ धावांपासून केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या स्पिनर सायमन हार्मरसमोर भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. मात्र फलंदाज बाद होण्याची मालिकाच सुरू झाली आणि संपूर्ण संघ १४० धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजा ८७ चेंडूत ५४ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
दक्षिण आफ्रिकेसाठी सायमन हार्मरने ३७ धावांत ६ विकेट घेतल्या. केशव महाराजने २, तर मार्को जानसेन आणि सेनुरन मुथुसामी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना सेनुरन मुथुसामीच्या १०९ आणि मार्को जानसेनच्या ९३ धावांच्या जोरावर ४८९ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने ४, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
हे ही वाचा:
पटेलजींच्या जयंतीमध्ये सहभागी होऊन गर्व वाटतो
भारतामध्ये बाबरी मशीद उभी राहणार नाही
हाँगकाँगमध्ये आगीत अनेक लोक अडकले
बास्केटबॉलचा खांब अंगावर कोसळून खेळाडूचा मृत्यू
भारतीय संघ पहिल्या डावात २०१ धावांवर बाद झाला आणि २८८ धावांनी पिछाडीवर गेला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जानसेनने ६, सायमन हार्मरने ३ आणि केशव महाराजने १ विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेने दुसरा डाव ५ बाद २६० धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावातील २८८ धावांच्या मोठ्या आघाडीच्या आधारावर भारतासमोर ५४९ धावांचे प्रचंड आव्हान ठेवले. पण भारताला हे आव्हान पेलवले नाही. कोलकाता टेस्ट ३० धावांनी जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने या विक्रमी विजयासह मालिका ०-२ ने जिंकली.
पहिल्या कसोटीत कोलकातामध्ये भारतीय संघ ३० धावांनी पराभूत झाला होता. त्यापेक्षाही मोठा पराभव दुसऱ्या कसोटीत सहन करावा लागला.







