न्यूझीलंड क्रिकेट संघने भारत क्रिकेट संघविरुद्ध निरंजन शाह स्टेडियमवर खेळलेला दुसरा एकदिवसीय सामना ७ विकेट्सने जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १–१ अशी बरोबरी साधली. मालिकेतील निर्णायक तिसरा सामना १८ जानेवारी रोजी इंदौर येथे खेळवण्यात येणार आहे.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत ७ बाद २८४ धावा केल्या. रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात करत १२.२ षटकांत ७० धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने ३८ चेंडूत ४ चौकारांसह २४ धावा केल्या. त्यानंतर शुभमन गिलने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या ९९ वर नेली.
गिल ५३ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकारांसह ५६ धावा करून बाद झाला. विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो २३ धावांवर माघारी परतला. २३.३ षटकांनंतर भारताची अवस्था ४ बाद ११८ अशी झाली होती.
येथून केएल राहुलने रवींद्र जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी ७३ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. जडेजा ४४ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि नितीश रेड्डी यांनी सहाव्या विकेटसाठी ५७ धावा जोडत संघाची धावसंख्या २४८ वर नेली.
केएल राहुलने ९२ चेंडूत १ षटकार आणि ११ चौकारांसह नाबाद ११२ धावांची शानदार खेळी केली, तर नितीश रेड्डीने २० धावांचे योगदान दिले.
न्यूझीलंडकडून क्रिश्चियन क्लार्कने ८ षटकांत ५६ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. काइल जॅमीसन, जॅक फाउल्केस, जेडन लेनॉक्स आणि कर्णधार मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ४७.३ षटकांत ३ विकेट्स गमावत सामना जिंकला. ४६ धावांपर्यंत डेव्हॉन कॉनवे (१६) आणि विल यंग (१०) बाद झाले होते. त्यानंतर विल यंग आणि डेरिल मिशेल यांनी १५२ चेंडूत १६२ धावांची दमदार भागीदारी करत संघाला २०८ धावांपर्यंत नेले. विल यंगने ९८ चेंडूत ७ चौकारांसह ८७ धावा केल्या.
डेरिल मिशेलने पुढे ग्लेन फिलिप्ससोबत चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा विजय निश्चित केला. मिशेलने ११७ चेंडूत २ षटकार आणि ११ चौकारांसह नाबाद १३१ धावांची जबरदस्त खेळी केली, तर फिलिप्स ३२ धावांवर नाबाद राहिला.
भारताकडून हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.







