आगामी एफआयएच महिला हॉकी नेशन्स कप न्यूझीलंड २०२५-२६ स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय महिला हॉकी संघ २१ मे ते ३ जूनदरम्यान ऑस्ट्रेलिया दौरा करणार असल्याची घोषणा हॉकी इंडियाने केली आहे. एफआयएच महिला हॉकी नेशन्स कप स्पर्धा १५ ते २१ जूनदरम्यान ऑकलंड येथे होणार आहे.
भारतीय महिला संघ पर्थ हॉकी स्टेडियमवर २६ ते ३० मेदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामने खेळणार आहे. पहिले दोन सामने २६ आणि २७ मे रोजी होतील, तर उर्वरित दोन सामने २९ आणि ३० मे रोजी खेळवले जातील.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना होणार असून तेथे नेशन्स कपपूर्वी सराव सामने खेळले जाणार आहेत.
यावर्षीच्या सुरुवातीला भारतीय महिला संघाने अर्जेंटिनाचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात भारताने चार सामने खेळले आणि त्यापैकी दोन सामन्यांत विजय मिळवला होता. या यशस्वी दौऱ्यानंतर आता संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे.
अर्जेंटिना दौऱ्यानंतर भारतीय संघ साई बेंगळुरू येथे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात कठोर सराव करत असून आगामी व्यस्त वेळापत्रकापूर्वी आपल्या उणिवा सुधारण्यावर भर देत आहे.
आनंदना आणि कोका-कोला इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने संघातील ड्रॅग-फ्लिकर खेळाडूंना २६ मे ते २१ जूनदरम्यान पर्थ (ऑस्ट्रेलिया) आणि ऑकलंड (न्यूझीलंड) येथे डच दिग्गज ताके ताकेमा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष ड्रॅग-फ्लिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मुख्य प्रशिक्षक शॉर्ड मारिन म्हणाले, “हॉकी इंडियामुळे हा दौरा शक्य झाल्याचा आम्हाला आनंद आहे. या दौऱ्यामुळे आमच्या कमतरता ओळखता येतील आणि प्रशिक्षण शिबिरानंतर झालेल्या सुधारणा तपासता येतील. अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यांमधून आम्हाला आमची पातळी समजली होती. आता मागील दोन विजयांनंतर मिळालेला आत्मविश्वास आणि गती कायम राखण्यात आम्ही किती यशस्वी ठरत आहोत, हे तपासण्याची संधी मिळेल.”
ते पुढे म्हणाले, “न्यूझीलंडला जाण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौरा केल्याने वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत होईल. लांबचा प्रवास एकाच वेळी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने केल्यामुळे खेळाडूंना परिस्थितीशी लवकर जुळवून घेता येईल. न्यूझीलंडमध्ये हवामान अधिक थंड असते आणि पर्थमधील परिस्थिती त्यासारखीच आहे.”
