आयपीएल २०२५च्या क्वालिफायर-२ सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर ५ गडी राखून विजय मिळवत थेट अंतिम फेरीत धडक मारली. मात्र सामन्यानंतरच्या एका क्षणाने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले – जेव्हा कॅप्टन श्रेयस अय्यर आपल्या सहकाऱ्यावरच चिडलेला दिसला!
सामना संपल्यानंतर जिंकलेल्या संघातील खेळाडू कॅप्टनला मिठी मारत आनंद साजरा करत होते. त्याच वेळी शशांक सिंगदेखील पुढे आला, पण… श्रेयस अय्यर त्याच्यावर भडकताना स्पष्टपणे दिसला. त्याने काहीतरी रागाने बोलले, आणि शशांक मात्र शांतपणे पुढे निघून गेला.
या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय. चाहत्यांचं म्हणणं आहे – “शशांक रनआऊट होताना जणू पार्कमध्ये जॉगिंग करत होता!“
श्रेयस अय्यरचा राग योग्यच होता, असं बहुतेकांनी म्हटलंय. अनेकांनी शशांकला यापुढे जबाबदारीनं खेळण्याचा सल्लाही दिलाय.
शशांक सिंगचा निर्णायक चूक
१७व्या ओव्हरची चौथी बॉल… सामना तोंडावर… आणि शशांक रनआऊट!
तेव्हा पंजाबला २१ चेंडूत ३५ धावांची गरज होती. अशा क्षणी त्याचा रनआऊट होणं म्हणजे टीमसाठी मोठा धक्का होता. त्याने फक्त २ धावा केल्या.
श्रेयस आणि नेहलची ‘विजयी जोडी’
या संकटातून टीमला बाहेर काढलं ते कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा यांनी. श्रेयसने नाबाद ८७ धावा केल्या, तर नेहलने ४८ रन्स देत सामना पंजाबकडे वळवला.
जोष इंग्लिसनेसुद्धा २१ बॉलमध्ये ३८ धावा करत सुरुवातीला चांगली गती दिली होती.
इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत!
पंजाबने अखेर १९व्या ओव्हरमध्ये २०४ धावांचं लक्ष्य पार केलं आणि मुंबई इंडियन्ससारख्या पाच वेळच्या चॅम्पियन संघावर शानदार विजय मिळवला.
आता अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होणार आहे. म्हणजेच, यावेळी IPL ला एक नवा चॅम्पियन मिळणार हे नक्की!







