आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू यांनी स्पष्ट मत व्यक्त करत सांगितलं की, यंदा चेन्नईची वाट खडतर असणार आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना रायडू म्हणाले की, यंदा सीएसकेच्या संघात अनेक युवा खेळाडू आहेत. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळते आणि ते दिलेल्या भूमिकेत किती फिट बसतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, त्यांची सर्वात मोठी चिंता म्हणजे चेन्नईची गोलंदाजी.
रायडू म्हणाले की, मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यासाठी नूर अहमदसारखा पर्याय असला, तरी पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये सीएसकेचा गोलंदाजी अटॅक कमकुवत दिसतोय. यामुळेच प्लेऑफमध्ये पोहोचणं संघासाठी कठीण होऊ शकतं.
संघावर आधीच दुखापतींचं सावट आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन एलिस आयपीएल २०२६ मधून बाहेर पडला आहे. स्पेन्सर जॉन्सन अजूनही दुखापतीतून सावरत आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात डेवाल्ड ब्रेविस उपलब्ध नसणार आहे. त्यातच एमएस धोनीलाही पिंडलीच्या दुखापतीमुळे पहिले दोन आठवडे खेळता येणार नाही.
या पार्श्वभूमीवर चेन्नईचा वेगवान गोलंदाजी विभाग मॅट हेनरीच्या खांद्यावर असणार आहे. त्याला खलील अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी आणि जेमी ओव्हरटन साथ देणार आहेत. फिरकीत नूर अहमदसोबत अकील हुसैन दिसू शकतो.
गेल्या हंगामातही सीएसकेची कामगिरी निराशाजनक होती. १४ पैकी फक्त ४ सामने जिंकून १० सामन्यांत पराभव स्वीकारत संघ तळात राहिला होता. त्यामुळे यंदा संघाला पुनरागमनासाठी मोठं आव्हान असणार आहे.







