आयपीएल २०२६ मधील ६७व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ५५ धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला ईशान किशन. त्याने ७९ धावांची तुफानी खेळी करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप-५ फलंदाजांमध्ये दमदार एंट्री केली आहे.
ईशान किशनने यंदाच्या हंगामात १४ सामन्यांत तब्बल १७८ च्या स्ट्राइक रेटने ५६९ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. ऑरेंज कॅप मात्र अजूनही गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनकडे कायम आहे. सुदर्शनने १४ सामन्यांत १५७ च्या स्ट्राइक रेटने ६३८ धावा केल्या आहेत.
गुजरातचा कर्णधार शुभमन गिल १३ सामन्यांत ६१६ धावा करून दुसऱ्या स्थानावर आहे. तर आरसीबीविरुद्ध २४ चेंडूत ५१ धावांची विस्फोटक खेळी करणारा हेनरिक क्लासेन ६०६ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अवघ्या १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी १३ सामन्यांत ५७९ धावांसह चौथ्या स्थानावर कायम आहे.
दुसरीकडे, पर्पल कॅपची शर्यतही तितकीच रंगतदार झाली आहे. आरसीबीचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार १४ सामन्यांत २४ विकेट घेत अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्सचा कगिसो रबाडानेही २४ विकेट घेतल्या असून तो दुसऱ्या स्थानावर आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा अंशुल कंबोज २१ विकेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. राशिद खानने १४ सामन्यांत १९ विकेट घेत चौथं स्थान पटकावलं आहे, तर सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज ईशान मलिंगा देखील १९ विकेटसह पाचव्या स्थानावर आहे.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला. अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि ईशान किशन यांनी अर्धशतकी खेळी करत आरसीबीच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
२५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूला २० षटकांत ४ बाद २०० धावांपर्यंतच मजल मारता आली. कर्णधार रजत पाटीदारने ५६ धावांची खेळी केली, तर वेंकटेश अय्यरने ४४ धावांचं योगदान दिलं. मात्र या पराभवानंतरही आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवत पहिल्या क्वालिफायरमध्ये प्रवेश निश्चित केला.
