आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२७ च्या तयारीला पाकिस्तान क्रिकेट संघाने आतापासूनच सुरुवात केली आहे. नव्या आणि संतुलित संघबांधणीवर भर देत पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी आगामी काळात मोठे बदल होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेआधी त्यांना एका गोष्टीची मोठी चिंता सतावत आहे.
३० मेपासून पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी माइक हेसन यांनी स्पष्ट केलं की, आता फक्त मोठ्या नावांवर अवलंबून न राहता युवा खेळाडूंना संधी देण्यावर पाकिस्तानचा भर असेल.
पीसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना हेसन म्हणाले, “वनडे वर्ल्ड कप लक्षात घेऊन आम्हाला खेळाडूंचा मोठा गट तयार करावा लागेल. फक्त जुन्या खेळाडूंवर विसंबून चालणार नाही. संघ अजून तयार होत आहे आणि अनेक विभागांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. दीड वर्षानंतर जेव्हा वर्ल्ड कप सुरू होईल, तेव्हा आमच्याकडे सर्वोत्तम संघ असायला हवा.”
पाकिस्तानने ‘व्हाईट-बॉल’ ट्रेनिंग कॅम्पचं आयोजन केलं असून त्यामध्ये युवा आणि वरिष्ठ खेळाडूंची कसून चाचणी घेतली जात आहे. नव्या प्रतिभावान खेळाडूंना संधी देऊन त्यांची क्षमता तपासण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं हेसन यांनी सांगितलं.
ते म्हणाले, “गेल्या दोन आठवड्यांत आम्हाला काही नवीन प्रतिभावान खेळाडू पाहायला मिळाले. त्यांच्यात क्षमता आहे, पण त्यांना अजून खूप मेहनत घ्यावी लागेल.”
फखर जमान, सईम अयूब आणि उस्मान खान यांसारखे महत्त्वाचे फलंदाज सध्या उपलब्ध नसल्याने युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे. विशेषतः फलंदाजी विभागात नवीन चेहऱ्यांची चाचणी घेतली जाणार आहे.
मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेबाबत हेसन सावध आहेत. याआधी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत ३-० ने धूळ चारली होती. त्यामुळे यावेळी ऑस्ट्रेलियन संघ अधिक आक्रमक आणि सूडाच्या भावनेने मैदानात उतरेल, अशी भीती हेसन यांनी व्यक्त केली.
हेसन म्हणाले, “ऑस्ट्रेलियाचा संघ मागच्या पराभवानंतर खूप दुखावलेला आहे. त्यामुळे ते यावेळी पूर्ण ताकदीने मैदानात उतरतील. सध्या वनडे क्रिकेट हे ऑस्ट्रेलियाचं सर्वात मजबूत फॉरमॅट आहे.”
युवा खेळाडूंना वेळ देण्याचं आवाहन करताना हेसन म्हणाले, “प्रत्येक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येताच चमकतो असं नाही. त्यामुळे चाहत्यांनी संयम ठेवणं गरजेचं आहे.”
