टी-२० विश्वचषक २०२६ आधी निर्माण झालेल्या पाकिस्तान-बांगलादेश वादावर अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह यांनी मौन सोडले आहे. कोणताही देश किंवा संघ संस्थेपेक्षा मोठा नसतो, असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी दोन्ही संघांना अप्रत्यक्षपणे आरसा दाखवला.
एका पुरस्कार समारंभात बोलताना जय शाह म्हणाले,
“विश्वचषकापूर्वी काही संघ स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबाबत खूप चर्चा आणि अटकळी लावल्या जात होत्या. मात्र ICC अध्यक्ष म्हणून मी एवढेच सांगू शकतो की कोणतीही टीम संघटनेपेक्षा मोठी नसते. ICC ही सर्व सदस्य देशांच्या सामूहिक प्रयत्नातून चालते.”
जय शाह यांनी यावेळी टी-२० विश्वचषकाने प्रेक्षकसंख्येचे नवे विक्रम प्रस्थापित केल्याचेही सांगितले. यावेळी एकूण व्यूअरशिपचे सर्व जुने रेकॉर्ड मोडले. तसेच असोसिएट देशांच्या संघांनीही दमदार कामगिरी केली.
त्यांनी उदाहरण देताना सांगितले की,
-
अमेरिकेने भारताला कडवी टक्कर दिली
-
नेदरलँड्सने पाकिस्तानला आव्हान दिले
-
नेपाळने इंग्लंडसमोर जोरदार लढत दिली
-
तर झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केले.
भारतीय संघाबद्दल बोलताना जय शाह यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव यांना भविष्यातील स्पर्धांसाठी अधिक तयारी करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसह आगामी मोठ्या स्पर्धांचा विचार करून टीमने आतापासूनच नियोजन करावे.
दरम्यान, विश्वचषकापूर्वी वाद तेव्हा सुरू झाला होता जेव्हा बांगलादेशने भारतात येण्यास नकार दिला होता. त्यानंतर ICC ने बांगलादेशला स्पर्धेबाहेर ठेवत त्याच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली.
यावर पाकिस्तानने बांगलादेशच्या समर्थनार्थ विश्वचषक बहिष्काराची धमकी दिली होती. सुरुवातीला पाकिस्तानने संपूर्ण स्पर्धेतून माघार घेण्याची भाषा केली, त्यानंतर भारताविरुद्धचा गट टप्प्यातील सामना न खेळण्याचीही घोषणा केली.
मात्र ICC च्या मध्यस्थीनंतर आणि बांगलादेशवर कोणताही बंदीचा निर्णय न घेण्याच्या आश्वासनानंतर पाकिस्तानने यू-टर्न घेत भारताविरुद्ध सामना खेळला.
स्पर्धेत मात्र पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक ठरली आणि ते सुपर-८ पलीकडे जाऊ शकले नाहीत, तर दुसरीकडे भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकत इतिहास रचला.







