केदार जाधव हा भारतीय क्रिकेटमधील एक प्रतिभावान ऑलराउंडर होता. त्याच्या क्षमतेनुसार संधी कमी मिळाल्या, पण मिळालेल्या प्रत्येक संधीचा त्याने उत्कृष्ट वापर करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
केदार जाधवचा जन्म २६ मार्च १९८५ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला. तो उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज होता. त्याच्या अनोख्या गोलंदाजी अॅक्शनमुळेही तो नेहमी चर्चेत राहिला.
महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही त्याला २९व्या वर्षी भारतीय संघात संधी मिळाली. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्याने वनडे आणि जुलै २०१५ मध्ये टी२० मध्ये पदार्पण केले. मात्र, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही.
टी२० मध्ये त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत, पण वनडे फॉर्मॅटमध्ये त्याने ७३ सामने खेळले. ५२ डावांत ४२.०९ च्या सरासरीने आणि १०१.६० च्या स्ट्राइक रेटने त्याने २ शतके आणि ६ अर्धशतकांसह १,३८९ धावा केल्या. या दरम्यान तो १९ वेळा नाबाद राहिला. त्याचा सर्वोच्च स्कोर १२० धावा आहे.
इंग्लंडविरुद्ध ३५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने ७६ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह १२० धावांची जबरदस्त खेळी करत भारताला ११ चेंडू राखून ३ विकेट्सने विजय मिळवून दिला होता. विशेष म्हणजे, सहाव्या क्रमांकावर किंवा त्याखाली फलंदाजी करत वनडे क्रिकेटमध्ये २ शतके झळकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला. तसेच, वनडेमध्ये त्याच्या नावावर २७ बळीही आहेत.
केदार जाधवने ९ टी२० सामने खेळले असून ६ डावांत १ अर्धशतकासह १२२ धावा केल्या आहेत. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ८ फेब्रुवारी २०२० रोजी ऑकलंड येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळला.
आयपीएलमध्ये त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांचे प्रतिनिधित्व केले. ९५ सामन्यांच्या ८१ डावांत त्याने ४ अर्धशतकांसह १,२०८ धावा केल्या. त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम २०२३ मध्ये होता.
३ जून २०२४ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. सध्या तो समालोचन क्षेत्रात करिअर घडवण्याचा प्रयत्न करत आहे.







