भारत नेपाळ आणि श्रीलंका या तीन देशातील सैन्याच्या उच्च अधिकाऱ्यांचा समावेश असलेली लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल रॅलीचे (अभियान) आज सायंकाळी अमरावती येथे आगमन झाले.
या मोहिमेचे सहभागी तीनही सैन्य दलाच्या जवानांचे यावेळी पुष्पहार घालून स्वागत करण्यात करण्यात आले. यावेळी खासदार बळवंत वानखडे, खासदार डॉ अनिल बोंडे,समाजसेवक लपीसेठ चंद्रकांत जाजोदिया,प्राचार्या कमलताई गवई आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित ही मोहिम नेपाळ, भारत आणि श्रीलंकेतील पवित्र बौद्ध स्थळांमधून पाच हजार सहाशे कि.मी चा प्रवास करणार आहे. या मोहिमेत सात जवान सहभागी झाले असून ते देशातील सात राज्यांतील प्रवासात गौतम बुद्धाच्या शांतीचा संदेश देणार आहे.
भगवान गौतम बुद्धांच्या जन्मस्थळी नेपाळ मधील lumbini येथे या मोहिमेचा समारोप होणार आहे. हे अभियान म्हणजे केवळ मोटरसायकल रॅली नसून शांततेसाठी आंतराष्ट्रीय मोहीम आहे. या माध्यमातून संपूर्ण जगभरात भगवान गौतम बुद्धाच्या शांतीचा संदेश पोहोचवणे हा असल्याचे कर्नल राजेश अढावू व संयोजक अतुल पाटील यांनी सांगितले.







