क्रिकेटच्या खेळात लवकरच महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी)ने जाहीर केले आहे की १ ऑक्टोबर २०२६ पासून सुधारित नियमांची अंमलबजावणी केली जाईल. या बदलांचा उद्देश खेळ अधिक परवडणारा, स्पष्ट आणि सर्वांसाठी सुलभ करणे हा आहे.
सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे बॅटसंदर्भातील बदल. इंग्लिश विलो बॅटच्या वाढत्या किमतींमुळे अनेक शौकिया खेळाडूंना आर्थिक अडचणी येत होत्या. त्यामुळे आता ‘लॅमिनेटेड बॅट’ (टाइप डी) वापरण्यास परवानगी देण्यात येणार आहे. या बॅटमध्ये पुढील भाग इंग्लिश विलोचा असतो, तर मागील भाग कमी किमतीच्या लाकडाचा असतो. त्यामुळे खर्च कमी होण्यास मदत होईल. मात्र आंतरराष्ट्रीय आणि एलिट स्तरावर पारंपरिक एकसंध विलो बॅटच वापरल्या जातील, अशी अपेक्षा आहे.
मल्टी-डे सामन्यांमध्येही एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. दिवसाच्या शेवटच्या षटकात विकेट पडली तरी सामना तात्काळ थांबवला जाणार नाही; ते षटक पूर्ण झाल्यानंतरच दिवसाचा खेळ संपेल.
सीमारेषेजवळील ‘बनी हॉप’ कॅचवर निर्बंध आणण्यात आले आहेत. आता फील्डरला सीमारेषेबाहेर जाऊन हवेत चेंडूला फक्त एकदाच स्पर्श करण्याची मुभा असेल. त्यानंतरचा कोणताही संपर्क पूर्णपणे मैदानाच्या आत असणे आवश्यक आहे. यामुळे वादग्रस्त निर्णयांना आळा बसेल.
विकेटकीपरच्या स्थानाबाबतही स्पष्टता देण्यात आली आहे. गोलंदाज रन-अप घेत असताना विकेटकीपरचे हात स्टंपसमोर असू शकतात, पण चेंडू सोडताना ते पूर्णपणे स्टंपमागे असणे बंधनकारक असेल. तसेच अंपायरला ‘डेड बॉल’ घोषित करण्याचे अधिक अधिकार देण्यात आले आहेत.
रन घेताना जाणीवपूर्वक फसवणूक नसेल तर फलंदाजांना रन सोडण्याची मुभा असेल. मात्र फसवणूक आढळल्यास फील्डिंग संघाला दंडात्मक लाभ दिला जाईल. स्टंपवर जाणूनबुजून मारलेला थ्रो आणि साधा मिसफिल्ड यामधील फरकही स्पष्ट करण्यात आला आहे.
ज्युनिअर आणि महिला क्रिकेटमध्ये चेंडूचा आकार आणि वजन मानकीकृत मर्यादेत ठेवले जाईल. ठरावीक तीन आकारांचा वापर करून खेळात सातत्य राखले जाईल.
एमसीसीने एकूण ७३ नियमांमध्ये बदल जाहीर केले असून, नियमांतील लिंगभेदी भाषा काढून टाकून अधिक समावेशक शब्दांचा वापर केला जाणार आहे. या नव्या बदलांमुळे क्रिकेट अधिक संतुलित, परवडणारे आणि पारदर्शक बनवण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.







