“ही केवळ एक शतकी खेळी नव्हती… ही होती एका देशाच्या स्वप्नांची जिद्दी उड्डाण!” एडन मारक्रमने १३६ धावांची पराक्रमी खेळी करत दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून थरारक विजय मिळवून दिला आणि विश्व टेस्ट चॅम्पियनशिपचं पहिलं ICC विजेतेपद जिंकून दिलं!
२८२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ५ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. मारक्रमने २०७ चेंडूंमध्ये १४ चौकारांसह १३६ धावा करत क्रिकेट इतिहासात स्वतःचं नाव अजरामर केलं.
काल २१३/२ पासून सुरुवात करताना कोणीच कल्पना केली नव्हती की ही टीम असं इतिहास रचेल. पहिल्या डावात केवळ १३८ धावांवर गारद झालेल्या आफ्रिकेने, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला २०७ वर गुंडाळलं आणि नंतर मारक्रमच्या जिद्दी खेळीच्या जोरावर स्वप्नवत विजय खेचून आणला.
मारक्रम जेव्हा १३६ धावांवर बाद झाले, तेव्हा त्यांची एकाग्रता, निर्धार आणि संयम पाहून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनाही त्यांच्या पाठीत थाप द्यावीशी वाटली. त्यांची ही खेळी एक ‘मॅच विनिंग’ नव्हे तर ‘नॅशन विनिंग’ ठरली.
दक्षिण आफ्रिकेचा विजय म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर संघर्ष, स्फूर्ती आणि संधी यांचं परिपूर्ण मिश्रण!
काइल वेरेन (४*) आणि डेव्हिड बेडिंघम (२१*) यांनी उरलेली औपचारिकता पार पाडत आफ्रिकेला ऐतिहासिक यशाच्या उंबरठ्यावर नेलं.







