लॉर्ड्सच्या पवित्र गवतावर एक अफ्रीकन योद्धा निःशब्दपणे इतिहास रचत होता… एडन मार्कराम! साउथ अफ्रिकेच्या या खंबीर फलंदाजाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीपुढे न झुकता शतक ठोकून क्रिकेटविश्वाला हादरवून टाकलं आहे!
मार्करामने १५९ चेंडूत नाबाद १०२ धावांची झुंजार खेळी करत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये शतक ठोकणारा पहिला साउथ अफ्रिकन फलंदाज होण्याचा मान पटकावला. त्याचबरोबर आयसीसीच्या कोणत्याही फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणारा तो अवघा तिसरा फलंदाज ठरला आहे.
पण ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही…
ही आहे त्या धाडसी खेळीची, जिथे एका संघाला इतिहास घडवायचा आहे!
दक्षिण आफ्रिकेला आता विजयासाठी केवळ ६९ धावांची गरज आहे. स्कोअर आहे २१३/२, आणि मैदानावर उभे आहेत दोन धडाडीचे योध्दे – एडन मार्कराम (१०२) आणि टेंबा बवुमा (६५)**. दोघांनी मिळून १४३ धावांची भागीदारी करत विजयाची चौकट जवळ आणली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१२ धावा केल्या. रबाडाने घेतले ५ बळी, पण आफ्रिकन संघ १३८ धावांत गारद झाला. कमिन्सने घेतले ६ बळी.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया पुन्हा गडगडली – एक वेळ अशी होती की ६६ वरच ६ बाद! पण केरी आणि स्टार्कने काहीसा डाग सांभाळला. रबाडाचा पुन्हा चार बळींचा मारा. लक्ष्य ठरलं २८२.
आता ते २८२चं स्वप्न जवळ आलंय… आणि एडन मार्करामच्या नजरेत ती चमक स्पष्ट दिसते — जिंकण्याची, इतिहास घडवण्याची आणि लाखो आफ्रिकन चाहत्यांच्या मनात आपली जागा अढळ करण्याची!







