ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना बॉक्सिंग डेपासून मेलबर्न येथे सुरू झाला आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. मात्र, थर्ड अंपायरच्या एका निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४५वे षटक इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मिचेल स्टार्क याने हवेत फटका मारला. हा झेल इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने अचूक टिपला आणि स्टार्क आठव्या विकेटच्या रूपात बाद झाला.
बाद झाल्यानंतर स्टार्क काही क्षण मोठ्या स्क्रीनकडे पाहताना दिसला. मात्र थर्ड अंपायर अहसान रजा यांनी निर्णय देताना स्पष्ट केले की चेंडू टाकताना ब्रायडन कार्सच्या पुढील पायाचा काही भाग क्रीजच्या मागे होता. त्यामुळे हा चेंडू नो-बॉल नसून वैध असल्याचा निर्णय देण्यात आला.
या निर्णयावरून अनेक माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. फॉक्स क्रिकेटनुसार, स्टार्क ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर दाखवण्यात आलेल्या रिप्लेमध्ये ब्रायडन कार्सचा पुढचा पाय पॉपिंग क्रीजच्या बाहेर असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे हा चेंडू नो-बॉल होता का, असा प्रश्न उपस्थित झाला.
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क वॉ यांनी समालोचन करताना म्हटले,
“मला अजूनही कळत नाही की त्याच्या बुटाचा कोणता भाग रेषेच्या मागे होता. माझे डोळेच फसवत असतील तर वेगळी गोष्ट, पण मला ते अजिबात दिसत नाही.”
सामन्याचा विचार केला तर, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या १५२ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मायकेल नेसर याने सर्वाधिक ३५ धावा केल्या. इंग्लंडकडून जोश टंग याने उत्कृष्ट गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात इंग्लंडलाही मोठी आघाडी घेता आली नाही. इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ ११० धावांवर बाद झाला. या डावात हॅरी ब्रूक याने ४१ धावांची सर्वाधिक खेळी केली, तर गस अॅटकिंसन याने २८ आणि कर्णधार बेन स्टोक्स याने १६ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून मायकेल नेसर याने ४ विकेट्स, स्कॉट बोलँड याने ३ विकेट्स, तर मिचेल स्टार्क याने २ विकेट्स घेतल्या. कॅमरन ग्रीन याला १ विकेट मिळाली.
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांची विक्रमी उपस्थिती पाहायला मिळाली. तब्बल ९३,४४२ प्रेक्षक मैदानात उपस्थित होते. एका दिवसातील क्रिकेट सामन्यासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी प्रेक्षकसंख्या मानली जात असून, पुढील दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.







