ज्या छोट्या यामालला घेतले होते कवेत, आज तोच आहे मेस्सीचा मुख्य प्रतिस्पर्धी

१९ वर्षांपूर्वीची दुर्मिळ भेट पुन्हा चर्चेत

ज्या छोट्या यामालला घेतले होते कवेत, आज तोच आहे मेस्सीचा मुख्य प्रतिस्पर्धी

फुटबॉल इतिहासातील महानतम खेळाडू मानला जाणारा लिओनेल मेस्सी आणि स्पेनचा लामिन यामाल यांच्यात रविवारी होणाऱ्या फिफा विश्वचषक अंतिम फेरीत प्रथमच आमनेसामने सामना रंगणार आहे. अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निमित्ताने या दोन खेळाडूंचा जुना फोटो आणि ते ऋणानुबंध समोर येऊ लागले आहेत.

मेस्सी आता ३९ वर्षांचा, तर लामिन यामाल १९ वर्षांचा आहे.  या दोघांची विश्वचषकासारख्या सर्वोच्च मंचावर भेट होणार आहे. मात्र, या दोघांची ही पहिली भेट नाही.

२००७ मध्ये झाली होती पहिली भेट

त्यांची पहिली भेट २००७ मध्ये झाली होती. त्यावेळी २० वर्षीय मेस्सी बार्सिलोनाच्या पहिल्या संघात नियमित खेळू लागला होता, तर लामिन यामाल अवघा पाच महिन्यांचा बाळ होता. ही दुर्मिळ भेट छायाचित्रकार जोन मॉनफोर्ट यांनी टिपलेल्या छायाचित्रांमध्ये कायमची जतन झाली आहे.

स्पेनने युरो २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर ही छायाचित्रे पुन्हा चर्चेत आली. यामालच्या वडिलांनी त्यापैकी एक छायाचित्र सोशल मीडियावर “दोन दिग्गजांच्या प्रवासाची सुरुवात” या कॅप्शनसह शेअर केले होते.

या छायाचित्रांमध्ये मेस्सी हसतमुखाने लहानग्या यामालला हातात घेताना आणि त्याला अंघोळ घालताना दिसतो. पुढे हा चिमुकला मुलगा मेस्सीच्याच पावलावर पाऊल ठेवत जागतिक फुटबॉलमध्ये चमकेल, याची त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती.

“हे नियतीचे अद्भुत चमत्कार आहे”

छायाचित्रकार जोन मॉनफोर्ट यांनी बीबीसी स्पोर्टशी बोलताना सांगितले. हा नियतीचा खरोखरच एक चमत्कार आहे. कधी कधी आयुष्यात अपेक्षेपेक्षाही खूप मोठी आणि विलक्षण गोष्ट घडते. जर ही कथा एखाद्या चित्रपटात दाखवली असती, तर तीही अविश्वसनीय वाटली असती.”

स्पर्धेतून निवड, मेस्सीसोबत फोटोशूट

हे फोटोशूट बार्सिलोनाच्या कॅम्प नोऊ स्टेडियममधील पाहुण्या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये झाले होते. लामिन यामालच्या कुटुंबाने यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका स्पर्धेत विजय मिळवला होता.

यामालचे वडील मुनिर नसराऊई (मोरोक्को वंशाचे) आणि आई शीला एबाना (इक्वेटोरियल गिनी येथील) हे लहानपणी आपल्या कुटुंबासह कॅटालोनियामध्ये स्थायिक झाले होते.

लामिन हा त्यांचा पहिला मुलगा आहे. त्याच्या जन्मानंतर कॅटलान वृत्तपत्र ‘स्पोर्ट’, बार्सिलोनाचा जर्सी प्रायोजक आणि आंतरराष्ट्रीय बालकल्याण संस्था युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सोडतीत त्यांनी सहभाग घेतला होता.

या उपक्रमात निवड झालेल्या कुटुंबांच्या बाळांचे बार्सिलोनाच्या पहिल्या संघातील खेळाडूंसोबत व्यावसायिक छायाचित्रण करण्यात येत होते. लामिन यामालच्या कुटुंबाची निवड झाली आणि योगायोगाने त्यांना फोटोशूटसाठी लिओनेल मेस्सीची जोडी मिळाली.

“मेस्सीला बाळ कसे हाताळायचे हेच कळत नव्हते”

मॉनफोर्ट म्हणाले, २०२४ मध्ये माझ्या एका मित्राने फोन करून सांगितले की, यामालच्या वडिलांनी तो फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तोपर्यंत त्या बाळाचा फोटोतील मुलगा लामिन यामालच आहे, हे मलाही माहीत नव्हते.”

ते पुढे म्हणाले, “मेस्सी स्वभावाने खूपच अबोल, लाजरा आणि शांत आहे. तो ड्रेसिंग रूममध्ये आला आणि त्याला अचानक एका अगदी छोट्या बाळासोबत फोटो काढायचे होते. त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. त्याला बाळ कसे हाताळायचे हेच समजत नव्हते.”

“तरुण मुलासाठी अशी परिस्थिती थोडी अवघड असते. पण लामिन खूप आनंदी आणि सतत हसणारे बाळ होते. त्याची आई शीला आम्हाला खूप मदत करत होती. ती स्वतःही खूप तरुण होती. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत साधारण परिस्थितीत होते, पण त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय छान होता.”

मॉनफोर्ट यांनी शेवटी सांगितले, अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये मेस्सी नेहमीच अत्यंत व्यावसायिक पद्धतीने वागत असे आणि त्याने त्या परिस्थितीशीही लगेच जुळवून घेतले.”

१९ वर्षांचा झालेल्या लामिन यामालने या वयातच अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मेस्सीने १९ वर्षांचा होईपर्यंत आपल्या कारकिर्दीत ११ गोल केले होते आणि एकदा ला लिगा तसेच एकदा यूईएफए चॅम्पियन्स लीग जिंकली होती.

दुसरीकडे, लामिन यामालने १९ वर्षांचा होईपर्यंत तब्बल ५६ गोल केले असून तीन वेळा ला लिगा, एकदा कोपा डेल रे आणि युरो २०२४ स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले आहे.

‘यामाल’ हे आडनाव नाही

अनेकांना वाटते तसे ‘यामाल’ हे त्याचे आडनाव नाही, तर त्याच्या दोन पहिल्या नावांपैकी दुसरे नाव आहे.

त्याचे पूर्ण नाव लामिन यामाल नराउई एबाना (Lamine Yamal Naraoui Ebana) असे आहे. बार्सिलोना आणि स्पेन या दोन्ही संघांकडून खेळताना तो आपल्या जर्सीवर ‘Lamine Yamal’ हेच नाव वापरतो.

यामागेही एक भावनिक कारण आहे. त्याच्या जन्माच्या काळात आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाला मदत करणाऱ्या दोन व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला ही दोन नावे दिली.

स्पॅनिश माध्यमांतील वृत्तांनुसार, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असताना दोन मित्रांनी त्यांना आर्थिक मदत केली होती. त्याबदल्यात आपल्या मुलाचे नाव त्या दोघांच्या नावावर ठेवण्याचे वचन यामालच्या वडिलांनी दिले होते.

अरबी भाषेत ‘लामिन’ या नावाचा अर्थ ‘प्रामाणिक’ किंवा ‘विश्वासार्ह’ असा होतो, तर ‘यामाल’ हे ‘जमाल’ या नावाचे रूप असून त्याचा अर्थ ‘सौंदर्य’ किंवा ‘देखणेपणा’ असा आहे.

अनेकांना वाटते तसे ‘यामाल’ हे त्याचे आडनाव नाही, तर त्याच्या दोन पहिल्या नावांपैकी दुसरे नाव आहे.

त्याचे पूर्ण नाव लामिन यामाल नराउई एबाना (Lamine Yamal Naraoui Ebana) असे आहे. बार्सिलोना आणि स्पेन या दोन्ही संघांकडून खेळताना तो आपल्या जर्सीवर ‘Lamine Yamal’ हेच नाव वापरतो.

यामागेही एक भावनिक कारण आहे. त्याच्या जन्माच्या काळात आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाला मदत करणाऱ्या दोन व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला ही दोन नावे दिली.

स्पॅनिश माध्यमांतील वृत्तांनुसार, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असताना दोन मित्रांनी त्यांना आर्थिक मदत केली होती. त्याबदल्यात आपल्या मुलाचे नाव त्या दोघांच्या नावावर ठेवण्याचे वचन यामालच्या वडिलांनी दिले होते.

Exit mobile version