भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जपान ओपन सुपर ७५० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना यजमान जपानच्या नोजोमी ओकुहारा हिच्याशी होणार होता. मात्र दुखापतीमुळे ओकुहाराने सामन्यातून माघार घेतल्याने सिंधूला थेट उपांत्य फेरीत स्थान मिळाले.
यंदाच्या हंगामातील सिंधूची ही तिसरी उपांत्य फेरी ठरली आहे. यापूर्वी तिने मलेशिया सुपर १००० आणि ऑस्ट्रेलिया सुपर ५०० स्पर्धांमध्येही उपांत्य फेरी गाठली होती. तसेच २०२३ डेन्मार्क ओपननंतर प्रथमच ती सुपर ७५० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे.
आता अंतिम फेरीतील स्थानासाठी सिंधूचा सामना टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि जगातील चौथ्या क्रमांकाची चीनची चेन युफेई हिच्याशी होणार आहे. सिंधू आणि युफेई यांच्यात आतापर्यंत झालेल्या १४ लढतींपैकी ८ सामने युफेईने, तर ६ सामने सिंधूने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, सिंधूला युफेईविरुद्धच्या सलग पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.
उपांत्य फेरीत विजय मिळाल्यास सिंधूचा हा पराभवाचा सिलसिला खंडित होईल आणि तिला जवळपास तीन वर्षांनंतर सुपर ७५० स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळेल. सध्या जपान ओपनमध्ये भारताकडून विजेतेपदाची आशा कायम राखणारी सिंधू ही एकमेव खेळाडू आहे.
यापूर्वी प्री-क्वार्टर फेरीत सिंधूने अवघ्या ३५ मिनिटांत जगातील पाचव्या क्रमांकाच्या हान युए हिचा २१-१६, २१-१४ असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
दरम्यान, चेन युफेईने यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तिने इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद पटकावले असून थायलंड आणि मलेशिया सुपर ५०० स्पर्धांच्या अंतिम फेरीतही मजल मारली आहे. तसेच सिंगापूर आणि इंडिया सुपर ७५० स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठत तिने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे.
