भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ‘कर्नल सी.के. नायडू लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले जाण्याची शक्यता आहे. तर भारताचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याला ‘मेंस क्रिकेटर ऑफ द ईयर’ म्हणून गौरवण्यात येऊ शकते. बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात १५ मार्च रोजी नवी दिल्ली येथे या पुरस्कारांची घोषणा होणार आहे.
‘नमन’ या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात अलीकडेच टी-२० विश्वचषक जिंकलेल्या पुरुष संघाचा, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ विजेत्या पुरुष संघाचा, महिला वनडे विश्वचषक २०२५ विजेत्या संघाचा तसेच दोन्ही गटांतील अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघांचा सन्मान करण्यात येणार आहे.
भारताला टी-२० विश्वचषक २०२४ जिंकून देण्यात मुख्य प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राहुल द्रविड यांना भारतीय क्रिकेटमधील दीर्घकालीन योगदानासाठी हा प्रतिष्ठेचा सन्मान दिला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शुभमन गिल अलीकडील टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग नसला तरी त्याने २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला ‘बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर – मेन’ या गटातील ‘पॉली उमरीगर अवॉर्ड’ मिळण्याची शक्यता आहे.
२६ वर्षीय गिलने २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये ९८३ धावा केल्या. इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोट्यांच्या मालिकेत त्याने १० डावांत ७५.४० च्या सरासरीने ७५४ धावा काढल्या. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली होती. त्याचबरोबर २०२५ मध्ये गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९० धावा केल्या असून चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याने १८८ धावा केल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनला सलग तिसऱ्या वर्षी ‘बेस्ट असोसिएशन’ म्हणून गौरवण्यात येऊ शकते.
रणजी ट्रॉफी एलिट गटात सर्वाधिक विकेट्स आणि धावा करणाऱ्या विदर्भच्या यश दुबे आणि यश राठौड या जोडीला ‘माधवराव सिंधिया अवॉर्ड’ दिला जाईल. तसेच रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामातील उत्कृष्ट ऑलराउंडर म्हणून यश दुबे याला प्रतिष्ठेचा ‘लाला अमरनाथ अवॉर्ड’ मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय उल्हास गांधे यांना ‘बेस्ट अंपायर अवॉर्ड’ मिळू शकतो. अंडर-१६ विजय मर्चंट ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या शांतनू सिंह आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यशवर्धन सिंह चौहान यांना ‘जगमोहन डालमिया ट्रॉफी’ दिली जाईल.
तसेच अंडर-१९ कूच बिहार ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या नित्या पांड्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या हेमचूडेशन यांना ‘एम.ए. चिदंबरम ट्रॉफी’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.







