पश्चिम आशियातील तणावामुळे एकीकडे पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धा आता दोन शहरांपुरतीच मर्यादित ठेवल्याने देशातील आर्थिक संकटाचे दर्शन झाले आहे. अशातच या स्पर्धेतील खेळाडूंच्या सुरक्षेच्या प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे. दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)ने विदेशी खेळाडूंना पीएसएलमधून माघार घेण्याचा इशारा दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेची कोणतीही हमी देता येणार नाही, असे TTPने धमकी देत म्हटले आहे.
TTPने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आम्ही पीएसएलमधील सर्व सहभागी, विशेषतः विदेशी खेळाडूंना एक स्पष्ट आणि महत्त्वाचा संदेश देऊ इच्छितो: सध्या देशातील अंतर्गत सुरक्षा आणि राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि नाजूक आहे. अशा वातावरणात, जिथे लष्करी कारवाया आणि नागरी आंदोलन देशाच्या मोठ्या भागावर प्रभाव टाकत आहेत, तिथे विदेशी खेळाडूंच्या सुरक्षेची कोणतीही हमी देता येत नाही.”
याआधीच पाकिस्तान लीगला अनेक धक्के बसले आहेत. सुरक्षा कारणास्तव स्पर्धा सहा शहरांऐवजी केवळ कराची आणि लाहोरपुरती मर्यादित करण्यात आली आहे, तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. TTPने आपल्या निवेदनात पीएसएलवर देशात ‘सामान्य परिस्थिती’ असल्याचा आभास निर्माण करण्याचा आरोप केला आहे. संघटनेने म्हटले आहे, “आम्ही खेळाच्या विरोधात नाही, पण सरकारचा दिखावा आम्हाला मान्य नाही. देशाच्या एका भागात क्रिकेट सामन्यांद्वारे ‘सामान्य स्थिती’चे चित्र निर्माण करणे आम्हाला मान्य नाही, जेव्हा दुसऱ्या भागात सरकारचे अत्याचार सुरूच आहेत.”
हे ही वाचा:
‘धुरंधर २’ कडून चार दिवसांत ६०० कोटींचा टप्पा पार!
ChatGPT च्या वापरकर्त्यांना दिसणार जाहिराती
नाल, चाबुआ हवाई तळाची माहिती पाकिस्तानला देणाऱ्या हवाई दलाच्या कर्मचाऱ्याला अटक
एअर कॅनडाचे विमान लँडिंगवेळी अग्निशमन दलाच्या वाहनाला धडकले
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला अल-कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना म्हणून आधीच घोषित करण्यात आले आहे, त्यामुळे या धमकीचे गांभीर्य अधिक वाढले आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे PSLचे आयोजन केवळ तीन दिवसांवर आले आहे. सुरुवातीला ही स्पर्धा विस्तारित स्वरूपात सहा शहरांमध्ये आयोजित करण्याचे नियोजन होते, मात्र मध्य-पूर्वेतील संकट आणि अफगाणिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे कार्यक्रमात बदल करावे लागले. आता विदेशी खेळाडूंच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या नव्या चिंतांमुळे स्पर्धेच्या भवितव्यावर अधिकच अनिश्चिततेचे सावट दाटले आहे. जर हा संकट अधिक गडद झाला, तर पीएसएलच्या आयोजनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.







