भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिने आपल्या कारकिर्दीत प्रत्येक खेळाडू स्वप्नात पाहतो ते यश मिळवलं. तिच्या कामगिरीने देशातील अनेक मुलींना बॅडमिंटनकडे वळण्याची प्रेरणा दिली. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली. २८ मार्च २०१५ रोजी ती जगातील क्रमांक एक स्थान गाठणारी पहिली भारतीय खेळाडू बनली.
हरियाणातील हिसार येथे जन्मलेल्या सायना अवघ्या ८ वर्षांची असताना तिचं कुटुंब हैदराबादला स्थलांतरित झालं. तिथेच तिची बॅडमिंटनमध्ये विशेष आवड निर्माण झाली. तिची आई उषा राणी नेहवाल या राज्यस्तरीय खेळाडू होत्या, त्यामुळे आईचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची जिद्दही सायनाच्या मनात होती.
२००८ मधील बीजिंग ऑलिम्पिक तिच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला. ती क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचली आणि याच यशाने तिचा आत्मविश्वास वाढवला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही. पुढील काळात तिने बीडब्ल्यूएफ हाँगकाँग ओपन, सिंगापूर ओपन आणि इंडोनेशिया ओपन स्पर्धा जिंकल्या. २०११ हे वर्ष तिच्यासाठी विशेष ठरलं.
२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने शानदार खेळ करत ब्रॉन्झ पदक जिंकले आणि इतिहास रचला. ती ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली बॅडमिंटनपटू ठरली. त्यानंतर तिने ऑस्ट्रेलियन ओपन, चायना ओपन आणि दोन वेळा इंडिया ओपन जिंकत आपला दबदबा कायम ठेवला.
२८ मार्च २०१५ हा तिच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण ठरला, जेव्हा ती जगातील क्रमांक एक खेळाडू बनली. हा मान मिळवणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली.
सायनाला २००९ मध्ये अर्जुन पुरस्कार, २०१० मध्ये मेजर ध्यानचंद खेल रत्न, २०१० मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये पद्मभूषण या सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.







