28.5 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरस्पोर्ट्सशीतल-तोमरची सुवर्णवेधक कामगिरी

शीतल-तोमरची सुवर्णवेधक कामगिरी

Google News Follow

एशियन पॅरा गेम्स २०२६ मध्ये भारतीय तिरंदाज शीतल देवी आणि तोमर कुमार या जोडीने कंपाउंड मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा १५१-१४८ असा पराभव करत भारताच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णाची भर घातली. या स्पर्धेतील तिरंदाजी प्रकारात भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले.

शीतल देवीचे नागोया स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. यापूर्वी तिने पायल नागच्या साथीने महिलांच्या कंपाउंड दुहेरी प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. अवघ्या १८ वर्षांच्या शीतलने सातत्यपूर्ण कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पुन्हा उमटवली आहे.

पात्रता फेरीत विश्वविक्रम

शीतल आणि तोमर यांनी मिश्र सांघिक पात्रता फेरीत १,४०२ गुणांची नोंद करत भारताचाच १,४०० गुणांचा जुना विश्वविक्रम मोडला. या कामगिरीमुळे भारतीय जोडीने जागतिक स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले.

दुसरीकडे, शीतलने महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड पात्रता फेरीत ७२० पैकी ७०४ गुण मिळवत तुर्कियेच्या ओझनूर क्युरे गिरडी हिच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. याच कामगिरीत तिने मार्चमध्ये बँकॉक येथे स्वतःच्या नावावर असलेला ६९८ गुणांचा आशियाई विक्रम सहा गुणांनी सुधारला. एशियन पॅरा गेम्सचा ६८० गुणांचा विक्रमही तिने मागे टाकला.

दुहेरी प्रकारातही विक्रमी कामगिरी

महिलांच्या कंपाउंड दुहेरी पात्रता फेरीत शीतलने पायल नागसोबत मिळून १,३७९ गुणांची नोंद केली. या कामगिरीसह भारतीय जोडीने आशियाई आणि एशियन पॅरा गेम्सचे नवे विक्रम प्रस्थापित केले. पायलने यामध्ये ६७५ गुणांचे योगदान दिले. त्यामुळे भारतीय जोडीने पात्रता क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले.

शीतलची पदकांची घोडदौड कायम

शीतलने २०२३ मधील हांगझोऊ एशियन पॅरा गेम्समध्ये महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर २०२४ च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक पटकावले. जागतिक विजेतेपदही मिळवलेल्या शीतलने कमी वयातच पॅरा तिरंदाजीतील आघाडीच्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.

नागोया येथे शीतल आणि तोमर यांच्या सुवर्णवेधी कामगिरीमुळे भारतीय तिरंदाजी संघाचा आत्मविश्वास उंचावला असून, स्पर्धेतील भारताच्या पदकांच्या आशा आणखी बळकट झाल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा