मँचेस्टर कसोटीच्या पाचव्या दिवशी गिलने मोठी कामगिरी केली. तो परदेशी दौऱ्यावर ७००हून अधिक धावा करणारा दुसरा भारतीय ठरला.
या बाबतीत त्याने सुनील गावस्कर यांची बरोबरी केली. गावस्कर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर ७७४ धावा केल्या होत्या. १९७९ मध्ये इंग्लंड दौऱ्यावरही त्यांनी असाच एक पराक्रम केला होता.
या मालिकेत त्यांनी ७३२ धावा केल्या. आता गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ७०० हून अधिक धावा करून एक मोठा विक्रम केला आहे. रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर शुभमन गिलला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले.
त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि निवड समितीला आपली निवड सार्थ करुन दाखवली. गिल फलंदाजीत चांगली कामगिरी करत आहे. इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ७०० पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.
याशिवाय ७०० पेक्षा जास्त धावा करणारा तो दुसरा भारतीय कसोटी कर्णधार ठरला. गिलने आणखी एक कामगिरी केली. इंग्लंडमध्ये परदेशी दौऱ्यावर कसोटी मालिकेत ७०० धावा करणारा तो तिसरा कर्णधार आहे.







