इंग्लंड दौऱ्यावर पहिल्यांदाच कसोटी संघाचे नेतृत्व करणाऱ्या शुभमन गिलचे त्याच्या फलंदाजी आणि कर्णधारपदासाठी सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ही मालिका २-२ अशी बरोबरीत राखण्यात भारतीय संघाला यश आलं.
या मालिकेनंतर शुभमन गिलच्या टी-शर्टचा लिलाव करण्यात आला. केवळ गिलच नाही तर भारत आणि इंग्लंडमधील क्रिकेटपटूंच्या अनेक वस्तूंचा लिलाव करण्यात आला ज्यामध्ये गिलचा टी-शर्ट सर्वात महागडा विकला गेला. शुभमन गिलने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात हा टी-शर्ट घातला होताजो सुमारे ५.४१ लाख रुपयांना खरेदी करण्यात आला होता.
हा लिलाव रेड फॉर रथ नावाच्या चॅरिटी फाउंडेशनने आयोजित केला होता. क्रिकेटपटूंच्या टी-शर्ट व्यतिरिक्त, कॅप्स, बॅट्स, तिकिटे देखील लिलावात घेण्यात आली होती भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचे टी-शर्ट दुसऱ्या क्रमांकावर होते.
दोघांच्याही जर्सी ४.८४ लाखांना विकल्या गेल्या. या दोघांनंतर केएल राहुलचे नाव होते ज्यांचा टी-शर्ट ४.७० लाखांना विकला गेला. इंग्लंड संघातील सर्वात महागडी जर्सी जो रूटची होती जी ४.४७ लाखांना विकली गेली. कर्णधार बेन स्टोक्सच्या जर्सीची बोली चार लाखांना लागली..कॅप्समध्ये, रूटची स्वाक्षरी केलेली कॅप सर्वात महाग होती.
या कॅपसाठी अंतिम बोली ३.५२ लाख रुपये होती. ऋषभ पंतची कॅप दुसऱ्या क्रमांकावर होती ज्यासाठी १.७६ लाख रुपयांची बोली लागली. लॉर्ड्सवर दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याचा एक दिवस इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसच्या रेड अँड रॅथ फाउंडेशनला समर्पित केला जातो.
या दिवशी क्रिकेटपटू, प्रसारक आणि प्रेक्षक देखील लाल रंगाचे कपडे घालतात. हे स्ट्रॉसच्या कर्करोगाने निधन पावलेल्या पत्नीला समर्पित आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वीया फाउंडेशनने गेल्या सहा वर्षांत ३५०० कुटुंबांना कर्करोगाशी लढण्यास मदत केल्याचे म्हटले होते.







