भारताचा माजी फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) दिग्गज खेळाडू सुरेश रैना याने संजू सॅमसनबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सॅमसनने सीएसकेसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असे मत रैनाने व्यक्त केले. त्याच्या मते, सॅमसन नंबर ३ वर खेळल्यास संघाचा फलंदाजी क्रम अधिक संतुलित होईल.
रैनाच्या मते ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रे यांनी डावाची सुरुवात करावी, तर सॅमसनला टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर यांना जोडणारी महत्त्वाची भूमिका देता येईल.
जिओ हॉटस्टारवर बोलताना रैना म्हणाला,
“संजू अनेक वर्षे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. त्यामुळे त्याची भूमिका स्पष्ट असायला हवी. गायकवाड आणि म्हात्रे यांनी ओपनिंग करावी आणि संजूने नंबर ३ वर खेळावे. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेविस नंबर ४, शिवम दुबे नंबर ५ आणि मग एमएस धोनी फलंदाजीला येतील. माझ्या मते धोनी फक्त शेवटच्या दोन-तीन षटकांतच फलंदाजी करतील.”
रैनाने सॅमसनला विकेटकीपर म्हणूनही समर्थन दिले. तो म्हणाला,
“संजू विकेटकीपर म्हणून संघात असेल. विश्वचषकात त्याने संघात सकारात्मक वातावरण तयार केले होते. त्याने सर्व खेळाडूंना एकत्र आणले.”
विशेष म्हणजे रैना स्वतः सीएसकेसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असे आणि संघाच्या फलंदाजीचा मुख्य आधार होता. त्याच्या निवृत्तीनंतर या क्रमांकासाठी संघाला योग्य फलंदाजाची गरज होती.
आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी सीएसकेने राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड करून संजू सॅमसनला संघात घेतले. सॅमसनला आयपीएलचा मोठा अनुभव असून त्याने १७७ सामन्यांत ३०.९५ च्या सरासरीने ४७०४ धावा केल्या आहेत. यात ३ शतके आणि २६ अर्धशतके आहेत.
दरम्यान, टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सॅमसनने शानदार कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत नाबाद ९७, उपांत्य फेरीत ८९ आणि अंतिम सामन्यात ८९ धावांची खेळी करत त्याने भारताला विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
एकूण ५ सामन्यांत ३२१ धावा करत सॅमसनला स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कारही मिळाला होता.
त्याच्या या कामगिरीनंतर विशेषतः सीएसकेच्या चाहत्यांच्या सॅमसनकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.







