भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने इतिहास रचला आहे. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्यानंतर सूर्यकुमार यादव हा असा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकला आहे.
रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषकावर आपली मोहर उमटवली. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने आपली पुढील दोन मोठी लक्ष्येही स्पष्ट केली आहेत.
३५ वर्षांचा झालेल्या सूर्यकुमार यादवबाबत विश्वचषकानंतर निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना सूर्यकुमारने या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आपली पुढील उद्दिष्टे सांगितली.
सूर्यकुमार यादव म्हणाला, “माझं पुढचं लक्ष्य म्हणजे २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे. त्याच वर्षी आपल्याला टी-२० विश्वचषकाचं विजेतेपदही कायम राखायचं आहे. हे विसरू नका.”
सूर्यकुमारच्या या वक्तव्यामुळे तो किमान पुढील काही वर्षे भारतीय संघासोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टी-२० विश्वचषक २०२४ नंतर सूर्यकुमार यादवकडे या फॉरमॅटची कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. २०२६ मध्ये घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याचे त्याचे लक्ष्य होते आणि त्यात तो यशस्वीही ठरला.
आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशांमधील कर्णधारांमध्ये सूर्यकुमार सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने आतापर्यंत ५२ टी-२० सामने कर्णधार म्हणून खेळले असून त्यापैकी ४२ सामने जिंकले, ८ सामने गमावले, तर २ सामन्यांचा निकाल लागला नाही. त्याचा विजयाचा टक्का ८०.७७ इतका आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ मधील पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध नाबाद ८४ धावांची खेळी करत सूर्यकुमारने भारताला विजय मिळवून दिला होता. पुढील सामन्यांमध्ये मोठ्या खेळी जरी झाल्या नसल्या तरी त्याच्या छोट्या पण महत्त्वाच्या खेळींनी संघाला स्थिरता दिली आणि मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
या स्पर्धेतील ९ सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने ३०.२५ च्या सरासरीने २४२ धावा केल्या. संजू सॅमसन आणि ईशान किशननंतर तो संघातील तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.







