टी20 विश्वचषक २०२६ स्पर्धेतील सुपर-८ फेरीसाठी आठ संघ निश्चित झाले असून आता सेमीफायनलमध्ये कोणते चार संघ पोहोचतील, याबाबत चर्चा रंगली आहे. भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, श्रीलंका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तान यांनी सुपर-८ मध्ये स्थान मिळवले आहे.
सुपर-८ फेरीसाठी संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. गट १ मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. गट २ मध्ये श्रीलंका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तान हे संघ आहेत.
२१ फेब्रुवारीपासून सुपर-८ फेरीला सुरुवात होणार असून प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. या फेरीतील पहिला सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. सर्व संघांचे पुढील लक्ष्य सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवणे हेच आहे.
दरम्यान, टी20 विश्वचषक २०२६ साठीच्या कमेंट्री पॅनेलमधील माजी भारतीय क्रिकेटपटूंनी संभाव्य सेमीफायनल संघांबाबत आपले अंदाज व्यक्त केले आहेत.
चेतेश्वर पुजारा यांनी भारत, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंड हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतात, असे मत व्यक्त केले. मोहम्मद कैफ यांनी भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांची निवड केली आहे.
माजी वेगवान गोलंदाज वरुण एरॉन यांनी भारत, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि पाकिस्तान यांना पसंती दिली आहे. तर भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगड यांनी भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचा अंदाज वर्तवला आहे.
लेगस्पिनर युजवेंद्र चहल यांनी भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांना टॉप चारसाठी पसंती दिली आहे. चहल हा २०२४ च्या टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
सुपर-८ फेरीतील कामगिरीनंतरच सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारे चार संघ निश्चित होणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता या सामन्यांकडे लागले आहे.







