भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या आयरलंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जून २०२६ मध्ये भारताचा संघ आयरलंडमध्ये दोन टी-२० सामने खेळणार आहे.
जाहीर वेळापत्रकानुसार, हे सामने २६ जून आणि २८ जून रोजी खेळवले जाणार असून दोन्ही सामने बेलफास्ट येथे होणार आहेत.
गेल्या काही वर्षांत भारताचा हा आयरलंड दौरा चौथ्यांदा ठरणार आहे. यापूर्वी २०१८, २०२२ आणि २०२३ मध्ये टीम इंडिया आयरलंडला भेट देऊन आली होती. विशेष म्हणजे, २००७ नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ बेलफास्टमध्ये खेळताना दिसणार आहे.
आयरलंडमध्ये भारतीय संघाच्या दौऱ्याबाबत नेहमीच मोठा उत्साह असतो. स्थानिक क्रिकेट चाहत्यांमध्ये टीम इंडियाबद्दल विशेष आकर्षण आहे. बीसीसीआय या दौऱ्यांसाठी प्रामुख्याने युवा खेळाडूंना संधी देत आला आहे. त्यामुळे यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली विश्वचषक विजेता संघ जाईल की नव्या खेळाडूंना संधी दिली जाईल, याबाबत उत्सुकता आहे.
भारत आणि आयरलंड यांच्यातील टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विक्रम अजूनही अभेद्य आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ८ सामने झाले असून सर्वच सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे.
हेही वाचा:
इराण युद्धाचा परिणाम: अमेरिकन शेअर बाजारात १ ट्रिलियन डॉलर्सची घसरण
इराणच्या नतांज अणु केंद्रावर हल्ला!
इराणकडून होर्मुज सामुद्रधुनी बंद; २० देशांची नाराजी
पंतप्रधान मोदींचा आक्षेपार्ह एआय फोटो पोस्ट केल्याप्रकरणी बिहारमधून एकाला अटक
दरम्यान, आयरलंडनेही २०२६ सालचे आपले वेळापत्रक जाहीर केले आहे. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी आयरलंड वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानसोबत २८ मे ते ४ जून दरम्यान त्रिकोणी टी-२० मालिका खेळणार आहे. तसेच, ५ ते १४ ऑगस्ट दरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध पाच वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
आयरलंडच्या या निर्णयाने काहींमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून, बोर्डाच्या मुख्य कार्यकारी सारा कीन यांनी हा निर्णय संस्थेच्या व्यापक हितासाठी घेतल्याचे स्पष्ट केले आहे.







