34 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरस्पोर्ट्सभारताच्या कपाळी विजय ‘तिलक’!

भारताच्या कपाळी विजय ‘तिलक’!

Google News Follow

सामना हातातून निसटणार, अशी परिस्थिती असताना तिलक वर्मा आणि नीतीश कुमार रेड्डी यांनी मैदानात धावांचा धडाका लावत भारताच्या विजयाचा टिळा लावला! न्यूझीलंडच्या जबड्यातून विजय हिसकावून घेत भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात ४ गडी राखून बाजी मारली. तिलकच्या नाबाद अर्धशतकाला नीतीशच्या फटकेबाजीची साथ लाभली आणि भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली. तिलकच्या बॅटमधून विजयाचा ‘तिलक’ लागला अन् न्यूझीलंडचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले!

तिलक-नीतीशची निर्णायक भागीदारी

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात सावध झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ४.४ षटकांत ४० धावा जोडल्या. सॅमसन १७ चेंडूंत १४ धावा करून बाद झाला, तर अभिषेकने २१ चेंडूंत २७ धावांचे योगदान दिले.

ईशान किशनच्या जागी संघात संधी मिळालेल्या वैभव सूर्यवंशीला मोठी खेळी करता आली नाही. तो ८ चेंडूंत ४ धावा करून माघारी परतला. कर्णधार श्रेयस अय्यरला ११ चेंडूंत केवळ ७ धावा करता आल्या. अक्षर पटेलही ११ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था अडचणीची झाली. नमन धीरने मात्र १७ चेंडूंत ३१ धावांची आक्रमक खेळी करत आशा कायम ठेवल्या.

अशा वेळी तिलक वर्मा आणि नीतीश कुमार रेड्डी यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवत सातव्या विकेटसाठी अवघ्या ३० चेंडूंत ६९ धावांची नाबाद भागीदारी रचली. तिलकने २६ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ५१ धावा केल्या. नीतीशने अवघ्या १३ चेंडूंत नाबाद २६ धावा ठोकल्या. या जोडीच्या तडाख्यामुळे भारताने १९.५ षटकांत ६ गडी गमावून विजय साकारला.

फिलिप्स-जेकब्सचा धावांचा पाऊस

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद १८० धावा केल्या. टिम सीफर्ट ७, डॅरिल मिचेल ६ आणि फिन अ‍ॅलन १६ धावा करून बाद झाल्याने न्यूझीलंडची सुरुवात अडखळती झाली. मात्र, ग्लेन फिलिप्स आणि बेव्हन जेकब्स यांनी डाव सावरला.

या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७६ चेंडूंत ११६ धावांची तडाखेबंद भागीदारी केली. जेकब्सने ४६ चेंडूंत ५८ धावा केल्या, तर फिलिप्सने अवघ्या ४३ चेंडूंत ७० धावांची आक्रमक खेळी साकारली. त्यामुळे न्यूझीलंडला १८० धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक २ बळी घेतले. भुवनेश्वर कुमार, प्रिन्स यादव आणि नीतीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने ४ षटकांत २१ धावा देत ४ बळी घेतले; मात्र तिलक आणि नीतीशच्या फटकेबाजीसमोर त्याची गोलंदाजी निष्प्रभ ठरली.

या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. अडचणीतून मार्ग काढत अखेरच्या षटकांत विजय खेचून आणणाऱ्या तिलक वर्मा आणि नीतीश कुमार रेड्डी यांनी भारताच्या विजयावर खऱ्या अर्थाने ‘तिलक’ लावला!

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा