भारताचा युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा आता इंग्लंडमधील प्रतिष्ठित काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या सुरू असलेल्या काऊंटी चॅम्पियनशिप २०२५ हंगामासाठी हॅम्पशायर संघाने त्याच्यासोबत करार केला आहे.
२२ वर्षीय तिलक वर्मा भारतासाठी आतापर्यंत ४ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळला आहे. त्याला अखेरच्यांदा १ जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सकडून आयपीएल २०२५ मधील क्वालिफायर २ मध्ये खेळताना पाहिले गेले होते.
बुधवारी हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए) ने यासंबंधी अधिकृत घोषणा केली. एचसीएने म्हटले की, “हैदराबादचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू एन. ठाकुर तिलक वर्मा याला हॅम्पशायर काउंटी संघाकडून ऑफर मिळाली आहे. एचसीए त्याच्या यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देते.”
तिलकने आतापर्यंत १८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५ शतके व ४ अर्धशतके ठोकत १२०४ धावा केल्या आहेत. त्याचा शेवटचा रेड-बॉल सामना सप्टेंबर २०२४ मध्ये दलीप करंडकात झाला होता, जिथे तो इंडिया ए संघाकडून खेळला होता.
हॅम्पशायर संघाने ७ सामन्यांत २ विजय, ३ बरोबरी आणि २ पराभव नोंदवले आहेत. पुढील सामना २२ ते २५ जून दरम्यान चेम्सफोर्ड येथे एसेक्सविरुद्ध होणार आहे. हाच सामना तिलक वर्माच्या काऊंटी पदार्पणाचा ठरू शकतो.
विशेष म्हणजे, चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन रुतुराज गायकवाड याच उन्हाळ्यात यॉर्कशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळणार आहे. तो जुलैमध्ये सरेविरुद्धच्या सामन्यात सहभागी होणार असून, पूर्ण हंगामासाठी उपलब्ध असणार आहे.







