आयपीएल २०२६च्या सुरुवातीपूर्वी टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आपल्या टॅटू कलेक्शनमध्ये एक खास आणि अर्थपूर्ण डिझाइनची भर घातली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा माजी कर्णधार असलेल्या कोहलीचा हा नवीन टॅटू त्याच्या आयुष्यातील अनुभव, बदल आणि विचारांची कहाणी सांगणारा आहे.
टॅटू बनवणाऱ्या स्टुडिओने दिलेल्या माहितीनुसार, हा टॅटू कोहलीच्या डाव्या हातावर तयार करण्यात आला आहे. यामध्ये आधीचे टॅटू काढून टाकण्याऐवजी त्यांना अधिक गहिरा आणि अर्थपूर्ण स्वरूप देण्यात आले आहे. जुन्या डिझाइन्सना नव्या कथेत गुंफण्याचा हा प्रयत्न असून तो सध्याच्या कोहलीच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारा आहे.
या टॅटूची सुरुवात भगवान शिवापासून प्रेरित आर्मबँडच्या नव्या डिझाइनपासून होते. त्यानंतर तो एक सुंदर मंडला पॅटर्नमध्ये रूपांतरित होतो, जो डॉटवर्क तंत्राने तयार करण्यात आला आहे. हा संपूर्ण पॅटर्न हातावर एक प्रवाही रचना तयार करतो आणि टॅटू स्लीवचा मजबूत पाया घालतो.
टॅटूमध्ये कमळ आणि पियोनीसारख्या फुलांचाही समावेश आहे. ही फुले शक्ती, विकास आणि अंतर्गत संतुलनाचे प्रतीक मानली जातात. मात्र, या डिझाइनमागील वैयक्तिक अर्थ पूर्णपणे उघड करण्यात आलेला नसल्याने त्यात एक रहस्यही कायम ठेवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, हा टॅटू स्लीव जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवण्यात आला आहे. भविष्यात कोहलीच्या आयुष्यात येणारे नवीन अनुभव, यश आणि बदल यानुसार यात आणखी भर पडत राहील. त्यामुळे हा टॅटू एका क्षणाचा नाही, तर त्याच्या संपूर्ण प्रवासाचा जिवंत दस्तऐवज ठरणार आहे.
विराट कोहली २००८ पासून आरसीबीशी जोडलेला आहे आणि आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक मानला जातो. आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले, ज्यामध्ये कोहलीची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्याने १५ सामन्यांत ८ अर्धशतकांसह ६५७ धावा केल्या होत्या.
आता आयपीएल २०२६ मध्ये आरसीबी जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार असून, पुन्हा एकदा विराट कोहलीकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.







