माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठान यांचे मत आहे की, आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला (RCB) पहिली ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर विराट कोहली आता आणखी भुकेला होईल आणि सलग आयपीएल विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल.
पंजाब किंग्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात ४३ धावांची महत्त्वाची खेळी करत कोहलीने आरसीबीच्या विजयानमध्ये मोठा वाटा उचलला होता. गेल्या हंगामात त्याने १५ सामन्यांत ६५७ धावा करत संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.
‘जिओस्टार’वर बोलताना इरफान पठान म्हणाले,
“विराट कोहलीमध्ये जिंकण्याची भूक कायम असते. खरं तर, गेल्या हंगामात ट्रॉफी जिंकल्यानंतर तो आधीपेक्षा अधिक भुकेला असेल. त्याला सलग आयपीएल ट्रॉफी जिंकायची इच्छा असेल. सामना जिंकण्याची आणि प्रभाव टाकण्याची त्याची इच्छा कधीच कमी होत नाही.”
पठान यांनी सांगितले की, कोहलीचा हा जिद्दी स्वभाव अलीकडील आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही दिसून आला. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहली प्रत्येक सामन्यात प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करताना दिसला.
दरम्यान, आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीचा पहिला सामना २८ मार्चला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.
पठान यांनी देवदत्त पडिक्कल याच्याबद्दलही मोठी अपेक्षा व्यक्त केली. मागील हंगामात त्याने १० सामन्यांत २४७ धावा केल्या होत्या आणि त्याचा स्ट्राइक रेट १५०.६० होता.
पठान म्हणाले,
“देवदत्त पडिक्कल आरसीबीच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये धावा केल्या आहेत. एक काळ असा होता की तो संघर्ष करत होता, पण आता तो पूर्णपणे वेगळा आणि आत्मविश्वासाने भरलेला खेळाडू दिसतो.”
पठान यांच्या मते, आधी आरसीबी संघ विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांच्यावर खूप अवलंबून होता. मात्र आता संघात अनेक मॅच-विनर खेळाडू असल्यामुळे टीम अधिक मजबूत झाली आहे.
त्यांनी असेही सांगितले की, जोश हेजलवुडच्या फिटनेसबाबत थोडी चिंता असली, तरी आरसीबीकडे नुवान तुषारा आणि जेकब डफी यांसारखे चांगले पर्याय आहेत, ज्यामुळे संघ अधिक संतुलित आणि ताकदवान दिसत आहे.







