गेल्या आठवड्यात जपान ओपन जिंकल्यानंतर पुरस्कार मंचावर डोळ्यांत अश्रू घेऊन उभी असलेली पी. व्ही. सिंधू ज्या क्षणाचा आनंद साजरा करत होती, त्या पुनरागमनाची खरी सुरुवात मात्र काही महिन्यांपूर्वी बेंगळुरूमध्ये झालेल्या एका शांत आणि अनौपचारिक भेटीत झाली होती.
जपान ओपनमधील विजय हा सिंधूचा दोन वर्षांहून अधिक कालावधीनंतरचा पहिला मोठा किताब ठरला. मात्र, त्यापूर्वीची २४ महिन्यांची वाटचाल तिच्यासाठी अत्यंत कठीण होती.
स्ट्रेस फ्रॅक्चरचा त्रास, पॅरिस ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरी, सातत्याने अपयश, वारंवार खंडित होणारे पुनर्वसन आणि २०२४ च्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर सुरू झालेला विजेतेपदाचा दुष्काळ यामुळे ती मानसिकदृष्ट्याही खचली होती. दुखापती आणि टीकेमुळे दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती सिंधू आपल्या कारकिर्दीतील अत्यंत कठीण टप्प्यावर पोहोचली होती.
सिंधूने विराट कोहलीला केला फोन
या कठीण काळात सर्वोच्च स्तरावरील एकाकीपणाची जाणीव समजू शकेल अशा व्यक्तीची गरज तिला भासली आणि तिने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याच्याशी संपर्क साधला.
सिंधूने एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले, “मी आयुष्यभर विराट भाईची ऋणी राहीन. माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण काळात मी त्यांच्याशी संपर्क साधला. दुखापती वाढत होत्या, निकाल मिळत नव्हते आणि मला अशा व्यक्तीची गरज होती, जी माझी परिस्थिती समजू शकेल. त्यांनी काही मिनिटांतच उत्तर दिले आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही भेटलो.”
या भेटीत सिंधूसोबत तिचे पती वेंकट दत्ता साई देखील उपस्थित होते. पुनरागमनाच्या संपूर्ण प्रवासात दत्ता साई यांनी तिची खंबीर साथ दिली असून, डेटा-आधारित प्रशिक्षणावर भर देणारा सध्याचा संघ उभारण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
‘ती चर्चा कायम आमच्यापुरतीच राहील’
सिंधू म्हणाली, “आमच्यात काय चर्चा झाली, हे कायम आमच्यापुरतेच राहील. पण मला गरज असताना विराट भाई माझ्यासोबत उभे राहिले, याबद्दल मी त्यांची कायम ऋणी राहीन. ते फार काही बोलले नाहीत, पण त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द माझ्या आणि दत्ताच्या मनात कायमचा कोरला गेला. काही संवाद तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतात. ही त्यापैकीच एक भेट होती.”
विराटचा साधा पण प्रभावी सल्ला
कोहलीने सिंधूला दिलेला सल्ला अत्यंत साधा होता.
“पदकांच्या आणि ट्रॉफींच्या मागे धावू नकोस. पुन्हा एकदा खेळण्यातला आनंद शोध.”
याबद्दल सिंधू म्हणाली, “त्या भेटीतून मी सर्वात मोठी गोष्ट शिकले, ती म्हणजे पुन्हा एकदा खेळण्यातला आनंद शोधणे.”
ती पुढे म्हणाली, “आज मी रोज सकाळी ५.३० वाजता सरावासाठी का उठते, हे मला स्पष्टपणे माहीत आहे. आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर त्यामागे ट्रॉफी किंवा विजय नाही. त्यापेक्षा खूप मोठे कारण आहे.”
जपान ओपनमध्ये ऐतिहासिक विजय
रविवारी तो आनंद ट्रॉफीच्या रूपाने तिच्यासमोर आला. सिंधूने अंतिम सामन्यात यजमान जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१७, २१-१७ असा सरळ गेममध्ये पराभव करत जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.
याचबरोबर ३१ वर्षांच्या सिंधूने सुपर ७५० स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी सर्वात वयस्कर महिला खेळाडू म्हणूनही इतिहास रचला.
हे ही वाचा:
आधी दहशतवाद थांबवा, मगच सिंधू करार!
खलिल अल-हय्या यांच्याकडे हमासचे नेतृत्व
एका दिवसावर लक्ष केंद्रित केले
सिंधूच्या पुनरागमनामागे मानसिक बळाबरोबरच तांत्रिक बदलांचाही मोठा वाटा होता. पती दत्ता साई, फिटनेस प्रशिक्षक वेन लॉम्बार्ड आणि इंडोनेशियन प्रशिक्षक इर्वानस्याह यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूने ३.५ किलो वजन कमी केले, नेटजवळील खेळ अधिक प्रभावी केला आणि केवळ ताकदीवर अवलंबून न राहता दीर्घ रॅली खेळण्याची क्षमता विकसित केली.
सिंधू म्हणाली, “माझ्यासाठी एका वेळी एकाच दिवसावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्त्वाचे होते. मी स्वतःला सतत सांगत होते, ‘उद्या काय होते ते पाहू. पुढे काय होते ते पाहू.’ आणि हळूहळू माझा खेळ सुधारू लागला.”
ती म्हणाली, “मला माझ्या सर्वोत्तम क्षमतेने खेळायचे होते. जर मी फक्त ५० टक्के तंदुरुस्त असेन आणि तरीही कोर्टवर उतरून पहिल्याच फेरीत पराभूत होणार असेन, तर त्याला काहीच अर्थ नव्हता.”
दुखापतीनंतर आत्मविश्वास डळमळला
सिंधूने कबूल केले की दुखापतीनंतर तिच्याही मनात शंका निर्माण झाल्या होत्या. “मी स्वतःला कधीच ‘माझे करिअर संपले का?’ असा प्रश्न विचारला नाही. पण खेळाडू म्हणून दुखापत झाली की मनात शंका येतात. ‘मी पुन्हा मजबूत पुनरागमन करू शकेन का? ही दुखापत पूर्णपणे बरी होईल का? मी शंभर टक्के देऊ शकेन का?’ असे अनेक विचार मनात येतात. त्या काळात मी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे थकून गेले होते.”
खेळात मोठे तांत्रिक बदल
प्रशिक्षक इर्वानस्याह यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूच्या खेळात मोठे बदल झाले.
ती म्हणाली, “आता फक्त जोरदार स्मॅश मारणे पुरेसे नसते. प्रतिस्पर्धी बचावात खूप मजबूत झाले आहेत. त्यामुळे खेळात विविधता असणे आवश्यक आहे. मी नेटजवळ आणि मागील कोर्टवरून ड्रॉप, हाफ-स्मॅश आणि क्लिअर अशा विविध फटक्यांचा वापर केला.”
डेटा झाला महत्त्वाचा आधार
सिंधूने सांगितले की, आता तिच्या प्रशिक्षणात डेटा विश्लेषणालाही मोठे महत्त्व आहे. “डेटा हा आमच्या तयारीतील सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे शरीरावरील ताण, हालचालीतील अडचणी आणि त्यामागची कारणे समजतात. अन्यथा आपणच स्वतःला ‘मी संथ झाले आहे का?’ असे विचारू लागतो आणि नकारात्मक मानसिकता तयार होते. डेटा मात्र नेमके काय घडते आहे आणि का घडते आहे, हे स्पष्टपणे सांगतो.”
आता पुढील महिन्यात नवी दिल्लीत होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेकडे आणि त्यानंतर जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांकडे सिंधूचा मोर्चा वळला आहे.
टीकाकारांना उत्तर देण्याबाबत ती म्हणाली, “मला कोणालाही उत्तर द्यायचे नाही. मला एवढेच सांगायचे आहे की, माझा स्वतःवरचा विश्वास कधीच ढळला नाही.”
