टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये जिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी पराभूत करत मोठा उलटफेर घडवला. क्रिकेट इतिहासात जिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवलेला हा एकूण पाचवा विजय आहे. त्यापैकी दोन वेळा टी२० आणि तीन वेळा वनडे प्रकारात त्यांनी कांगारूंना धूळ चारली आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियावर मिळवलेला हा जिम्बाब्वेचा तिसरा विजय ठरला आहे.
चला पाहूया, वर्ल्ड कपमधील ते तीन ऐतिहासिक क्षण —
वनडे वर्ल्ड कप १९८३ : नॉटिंगहॅममधील पहिला धक्का
९ जून रोजी नॉटिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात जिम्बाब्वेने ६ बाद २३९ धावा केल्या. डंकन फ्लेचर यांनी ८४ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ६९ धावांची खेळी केली, तर इयान बुचार्ट यांनी ३४ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून डेनिस लिली आणि ग्राहम यालोप यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया ६० षटकांत ७ बाद २२६ धावांपर्यंतच पोहोचू शकला आणि जिम्बाब्वेने १३ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. केप्लर वेसल्स (७६) आणि रॉड मार्श (५०) यांच्या खेळी व्यर्थ ठरल्या. जिम्बाब्वेकडून डंकन फ्लेचर यांनी ४२ धावांत ४ बळी घेत निर्णायक भूमिका बजावली.
टी२० वर्ल्ड कप २००७ : केपटाउनमध्ये कांगारूंना धक्का
१२ सप्टेंबर रोजी केपटाउन येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ९ बाद १३८ धावांवर मर्यादित राहिला. ब्रॅड हॉग (नाबाद ३५) आणि अँड्र्यू सायमंड्स (३३) यांनी प्रयत्न केले, पण एल्टन चिगुंबुरा (३ विकेट) आणि गॅरी ब्रेंट (२ विकेट) यांनी प्रभावी मारा केला.
जिम्बाब्वेने १९.५ षटकांत ५ विकेट राखून लक्ष्य गाठले. ब्रेंडन टेलरने ४५ चेंडूत ६ चौकारांसह नाबाद ६० धावा करत विजयाची पायाभरणी केली. हॅमिल्टन मसाकाद्झा यांनी २३ धावा जोडल्या.
टी२० वर्ल्ड कप २०२६ : कोलंबोमध्ये तिसरा पराक्रम
१३ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे झालेल्या सामन्यात जिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर २३ धावांनी मात केली. ब्रायन बेनेटने नाबाद ६४ धावा केल्या, तर तदिवानाशे मारुमानी आणि रायन बर्ल यांनी प्रत्येकी ३५ धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया १९.३ षटकांत १४६ धावांवर गारद झाला. मॅट रेनशॉने ६५ धावा केल्या, तर ग्लेन मॅक्सवेलने ३१ धावांची खेळी केली. ब्लेसिंग मुजारबानीने ४ विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव खिळखिळा केला.







