सरकारी मालकीच्या एमटीएनएल कंपनीला घरभेद्यांकडूनच मोठा फटका बसत असल्याचे समोर आले आहे. एमटीएनएलच्या केबल चोरीच्या वाढत्या घटनांचा तपास करत असलेल्या गुन्हे शाखा युनिट-१० च्या पथकाने एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात कांदिवली टेलिफोन एक्स्चेंजमधील एका लिपिकाचा सहभाग उघड झाला असून, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गुन्हे शाखा युनिट-१० चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल राजे आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, ३० जूनच्या पहाटे बोरीवली पूर्व येथील मागाठाणे टेलिफोन एक्स्चेंजजवळ केबल चोरी करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४० लाखांच्या केबल, एक जेसीबी मशीन आणि टेम्पो असा १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.
पकडलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, या टोळीचे धागेदोरे एमटीएनएलच्या अंतर्गत यंत्रणेपर्यंत पोहोचले. पोलिसांनी साकीनाका भागातून साहिल केळकर आणि मनोज गुप्ता यांना अटक केली. त्यांच्या माहितीवरून शुक्रवारी रात्री उशिरा कांदिवली टेलिफोन एक्स्चेंजमध्ये लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या विनोद यादव या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली.
विनोद यादव हा एमटीएनएलच्या केबल चोरट्यांशी हातमिळवणी करून कार्यरत होता. त्याच्या संगनमताने गोरेगाव, समतानगर, कांदिवली, मिरा रोड आणि बोरीवली परिसरातून गेल्या काही काळात कोट्यवधी रुपयांच्या केबल चोरल्या गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हे ही वाचा:
नो नेटवर्क, नो टेन्शन! BSNL ने आणला खास सॅटेलाइट फोन
बीएचयूमध्ये झाडांची बेकायदा तोड महागात; २.६५ कोटींची भरपाई
‘फिलिप्स’च्या आरोग्यसेवा AI सोल्युशनसाठी भारताला पसंती
वन्यजीव तस्कर अडकले जाळ्यात; सीबीआय, डीआरआयची कारवाई
या प्रकरणामुळे एमटीएनएलच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखा आता या रॅकेटमध्ये आणखी किती कर्मचारी किंवा अन्य व्यक्तींचा सहभाग आहे, याचा शोध घेत आहे. या प्रकरणात लवकरच आणखी काही महत्त्वाच्या अटक होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त (डिटेक्शन-१) नवनाथ ताकाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



