घर पाहायला गेलेल्या दाम्पत्यावर पिटबुल कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी

घर पाहायला गेलेल्या दाम्पत्यावर पिटबुल कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

पंजाबमधील पाटियालामध्ये भाड्याचे घर पाहण्यासाठी गेलेल्या दाम्पत्यावर पाळीव पिटबुल कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराचा दरवाजा उघडताच पिटबुल अचानक बाहेर धावून आला आणि त्याने शिफाली सभरवाल यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या हातांसह शरीराच्या इतर भागांवर खोल जखमा झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या हात आणि पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गंभीर दुखापतींमुळे त्यांच्यावर प्लास्टिक सर्जरीही करण्यात आली असून सध्या त्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.

या हल्ल्यात शिफाली यांचे पती अंकित सभरवाल हेदेखील जखमी झाले. पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांच्या पायांवर आणि पाठीवर कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्या शरीरावर अनेक टाके पडले आहेत. अंकित यांच्या म्हणण्यानुसार, कुत्र्याच्या मालकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र पिटबुलने हल्ला सुरूच ठेवला. या घटनेनंतर त्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा:
एअर इंडियाच्या सर्व वैमानिकांसाठी डोप टेस्ट अनिवार्य

‘शुद्धीकरणा’वरून खर्गे-नड्डा आमनेसामने

आरजी कर बलात्कार- हत्या प्रकरणात तृणमूल नेते निर्मल घोष अटकेत

तरुणांसाठी सरकारी धोरणनिर्मितीची दारे खुली

या संपूर्ण घटनेचे कथित सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. फुटेजमध्ये पिटबुल दाम्पत्यावर हल्ला करताना दिसत असून, परिसरातील काही नागरिक काठ्यांच्या मदतीने कुत्र्याला दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. एका महिलेने काठी घेऊन कुत्र्याला रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र तो थांबला नाही. अखेर आणखी काही नागरिकांनी धाव घेत जखमी दाम्पत्याला कुत्र्याच्या तावडीतून बाहेर काढले.

ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनीही दखल घेतली आहे. डीएसपी जंगजीत रंधावा यांनी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून कुटुंबीयांशी संपर्क साधल्याचे सांगितले. शिफाली यांचा वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पाळीव प्राण्याच्या हल्ल्यात व्यक्ती जखमी झाल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २९१ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. धोकादायक कुत्र्यांच्या जातींबाबत न्यायालयाच्या आदेशानुसारही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version